नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मनसेतील अंतर्गत संघर्षानंतर नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात गजानन काळे यांनी म्हटलंय की, सलग दोन-तीन निवडणुका न लढताही नवी मुंबई विधानसभेत यंदाच्या निवडणुकीत ५० हजार लोकांनी मनसेवर विश्वास दाखविला. गेल्या ५ वर्षात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा प्रयत्न मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र अमित ठाकरेंच्या मोर्च्याला यश येऊ नये त्याच्या एक दिवस अगोदर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला अन् राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांनी लक्ष घातल्यानंतरच गटातटाच्या राजकारणाला खतपाणी मिळाले असा आरोप त्यांनी केला.
तसेच या संपूर्ण घटनेसाठी अविनाश जाधव यांनी मला दोषी ठरवले. दुसरी बाजू ऐकून घेण्याची तसदी नेते म्हणून घेतली नाही. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित झालो असून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणे अशक्य आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देतोय. मात्र महाराष्ट्रसैनिक म्हणून पक्षाचं काम करण्याचा माझा निर्णय आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास व प्रेम केले. म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात नाही. ते मी करणार नाही असा विश्वास गजानन काळे यांनी पक्षाला दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गतमहिन्यात मनसेच्या तिघा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु २१ दिवसांतच त्यांनी पुन्हा घरवापसीला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकारावरून नवी मुंबई मनसेत गटबाजीला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. सत्ताधारी व प्रशासन यांच्या विरोधात आंदोलने करून मनसेने मागील काही वर्षांत नवी मुंबईत विरोधी पक्षाचे स्थान मिळवले आहे. त्याआधारे वाढत्या जनाधाराच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीतही मनसे आपले उमेदवार उतरवणार आहे. तशा प्रकारची अधिकृत घोषणाही पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. अशातच गतमहिन्यात मनसेच्या तिघा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामागे पक्षात उमेदवारीचे दावेदार म्हणून स्थान मिळाल्याच्या चर्चा होत्या.