नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ मशीन वापरण्यात येणार आहेत. याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडून २७ डिसेंबरपासून २५ जानेवारीपर्यंत जनजागृती मोहीम सुरू आहे. या अंतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित असून कोणत्याही परिस्थितीत ते रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून हॅक करून वा छेडछाड करून निवडणूक निकाल बदलता येत नाही, हे पटवून दिले जात आहे.
याच अंतर्गत बुधवारी वाशी येथे रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि प्रवाशांना मशीनचे प्रत्यक्ष सादरीकरण करून जनजागृती केली. यावेळी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीन युनिटही बाजूला ठेवले होते.या जनजागृतीत मतदानयंत्र कसे काम करते, एखाद्या पक्षाला मत दिल्यानंतर मतदार त्याची खात्री कशी करू शकतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच निवडणूक अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या प्रात्यक्षिकावेळी मतदाराला कोणत्या शंका असतील, तर त्याचे निरसनही करण्यात येत आहे. मतदाराने कोणाला मत दिले, याची खात्री बाजूला ठेवलेल्या व्हीव्हीपॅट मशीनच्या साहाय्याने केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्या मतदानाची पावती त्याच यंत्रात संरक्षित होते.