नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त सिडको भवनला गुरुवारी घेराव घालणार आहेत. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सकाळी आठ ते रात्री आठच्या दरम्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण फाटा ते खारघर दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून, महामार्गावरील वाहतूक शिळफाटामार्गे वळली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. नाशिक, पुणे येथून जादा पोलीस मनुष्यबळ तैनात केले आहे. सात हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत. किल्ला जंक्शन, सीबीडी महाकाली चौक, पार्क हॉटेल व जुन्या महानगरपालिका मुख्यालयाकडून सिडको भवनकडे येणारे रस्तेही वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत.
मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक नवी मंबईतून महापे, शिळफाटामार्गे कळंबोली सर्कलकडे वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून येणारी वाहने पुरुषार्थ पेट्रोल पंपापासून तळोजा एमआयडीसी, रोड पालीकडून शिळफाटा, महापे, ऐरोलीकडून मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. अवजड वाहनांना नवी मुुंबईच्या परिसरात येण्यास व येथून बाहेर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.