नारायण जाधव, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी हवाई दलाच्या सी-२९५ एअरक्राफ्टची लँडिंग आणि सुखोई-३० एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी यशस्वी झाली. ही दोन्ही विमाने धावपट्टीवर उतरली. त्या निमित्ताने चाचण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे चित्र आहे.
विमानतळ आणि परिसरातील अनेक कामे अजूनही अपूर्ण असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते. परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
नवी मुंबई विमानतळाची राहिलेली कामे
- टर्मिनल बिल्डिंगचे २० टक्के काम अद्यापही झालेले नाही.
- एअर ट्रॅफिक कंट्रोल टाॅवरचे काम पूर्ण झाले असले तरी यंत्रणा बसविण्याचे काम झालेले नाही.
- विमानांच्या संचलनासाठी आवश्यक असलेल्या रडार यंत्रणा बसविण्याच्या कामाची आता कुठे निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- विमानतळाच्या प्रभावित क्षेत्रातील उंच इमारतींचा सर्व्हे विकासक कंपनीने सुरू केला आहे. यासाठी परिसरातील सोसायट्यांकडून त्यांच्या इमारतींची उंचीची माहिती मागवून विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.
- विमानतळाच्या मार्गातील डोंगराच्या सपाटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.
- विमानतळाच्या दि. बा. पाटील नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित.
- अटल सेतू ते विमानतळाला जोडणाऱ्या सागरी मार्गाच्या उभारणीचे काम आता कुठे सुरू झाले आहे.
- पनवेल, पुण्याकडून विमानतळाला जोडणारे रस्ते, पूल यांचे काम अपूर्ण.
- नवी मुंबई व मुंबई विमानतळ मेट्रोने जोडण्याचा प्रस्ताव अद्यापही कागदावरच.