‘कोल्ड प्ले’ मुळे नवी मुंबई मालामाल; हॉटेल, पार्किंगच्या जागा फुल्ल; एनएमएमटीच्या जादा बस तैनात
By नामदेव मोरे | Updated: January 18, 2025 09:32 IST2025-01-18T09:31:51+5:302025-01-18T09:32:13+5:30
पार्किंगच्या जागांचेही आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे.

‘कोल्ड प्ले’ मुळे नवी मुंबई मालामाल; हॉटेल, पार्किंगच्या जागा फुल्ल; एनएमएमटीच्या जादा बस तैनात
- नामदेव मोरे
नवी मुंबई : ‘कोल्ड प्ले’या विख्यात ब्रिटिश रॉक बॅण्डचा शो आज, शनिवारपासून येथील डी. वाय पाटील स्टेडियममध्ये होत आहे. या कॉन्सर्टमुळे देशभरातून रॉक बॅण्डचे चाहते शहरात येणार असल्याने येथील प्रमुख हॉटेलच्या खोल्या फुल्ल झाल्या आहेत.
पार्किंगच्या जागांचेही आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे. देशविदेशातून येणाऱ्या चाहत्यांच्या वाहतुकीसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या २५ बस सज्ज झाल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शोमुळे शहराच्या अर्थव्यस्थेत मोलाची भर पडणार आहे.
कोल्ड प्ले रॉक बॅण्ड शोचा आनंद लुटण्यासाठी अनेक तरुण देशविदेशातून शहरात डेरेदाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हॉटेल सज्ज झाली आहेत. वाशी ते खारघरपर्यंतची सर्व प्रमुख हॉटेल १८ ते २० जानेवारीदरम्यान हाऊसफुल्ल आहेत.
हॉस्पिटॅलिटीसाठी बूस्टर
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या एका प्रमुख हॉटेलमध्ये कमीत कमी ५० हजार रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये एक रूमसाठी मोजावे लागणार आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेच दर १२ हजार ते १ लाख १२ हजार एवढे असणार आहेत. शहरातील इतर हॉटेलच्या दरामध्येही वाढ झाली आहे. अनेक हॉटेलमधील सर्व रुम्सचे बुकिंग झाले आहेत. कोल्ड प्ले काळात हॉटेल व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. हा कार्यक्रम हॉस्पिटॅलिटी व्यवसायासाठी बूस्टर ठरला आहे.
रंगरंगोटीसाठी २५ लाख
कोल्ड प्लेच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने महामार्गासह डॉ. डी. वाय. पाटील मैदान परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली आहे. रस्त्यांची डागडुजी करून दुभाजकांची रंगरंगोटी केली आहे. त्यासाठी साधारण २५ लाख रुपये खर्च झाला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलसमोरील तुलसी मैदान व सेक्टर १५ मध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
असे आहेत नवी मुंबईतील हॉटेलचे वाढलेले दर
हॉटेलचे नाव कार्यक्रमाच्या दिवशीचे दर कार्यक्रमानंतरचे दर
कोर्ट यार्ड मेरियट ५० हजार ते दीड लाख १२ हजार ते १ लाख १२ हजार
विवांता २१ हजार ते ४०,५०० ८ हजार ते २३ हजार
आयबीआयएस २१ हजार ९३००
फोरपॉइंट २२ हजार ते २३,६०० १४ हजार ते १६ हजार
तुंगा १४ हजार ते ५६ हजार ७५०० ते २६५००
योगी १८,७०० ६१००