नवी मुंबई: गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. नागरी उड्डाण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला या कामाचा अहवाल मागविला जातो. शिंदे यांनी शनिवारी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सिडकोसह संबधित यंत्रणासोबत बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडणारनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. तर, भविष्यात जलमार्गाचा पर्यायसुद्धा उपलब्ध केला जाणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग ४ बी ३४८, सायन पनवेल-महामार्ग आणि शुक्रवारी उद्घाटन झालेला शिवडी-न्हावाशेवा सेतू हे तीन मार्ग विमानतळाला जोडले गेले आहेत. तर, खारकोपर-उरण मार्गावरील तरघर रेल्वेस्थानक विमानतळाच्या जवळ आहे. तसेच, मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि अदानी समूहाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.विमानतळाचे पहिले टेकऑफ लांबणीवर
नवी मुंबई विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्याचा व्यावसायिक वापर ३१ मार्च २०२५ पासून सुरू केला जाईल. कारण विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत आहेत. त्यानुसार प्रत्येक संस्थेला जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नामकरणाचा निर्णय कॅबिनेट घेईलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. असे असले तरी या नामकरणाचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विमानतळाची वैशिष्ट्ये
नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर, टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला.