स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईचा डंका; ठरले देशातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर
By नारायण जाधव | Published: January 11, 2024 12:30 PM2024-01-11T12:30:45+5:302024-01-11T12:32:13+5:30
यंदा इंदौर व सुरतला संयुक्तपणे गौरविण्यात आले आहे.
नारायण जाधव, नवी मुंबई : देशातील स्वच्छ शहरांत राहण्याची परंपरा नवी मुंबईने यंदाही कायम राखली आहे. २०२३ वर्षात नवी मुंबईने देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत एका स्थानाने झेप घेऊन यंदा देशभरात दुसरा क्रमांक मिळवला आहे. यंदा इंदौर व सुरतला संयुक्तपणे गौरविण्यात आले आहे.
नवी दिल्लीत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घन कचरा व्यवस्थापन विभागाची उपायुक्त बाळासाहेब राजळे आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते स्वीकारला. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम नवी दिल्लीत सुरू आहे
गतवर्षीच्या देशपातळीवर राबवण्यात आलेल्या स्वच्छ शहर अभियानात इंदोरने प्रथम क्रमांक पटकावला होता.तर दुसऱ्या स्थानावर सुरत तर तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई शहर होते. यावर्षीही नवी मुंबई महापालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य घेऊन शहरात स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळण्याची पालिकेला उत्सुकता होती. मात्र दुसरा क्रमांक मिळवून एका स्थानाची झेप घेतल्याने प्रशासनाची विश्वास दुणावला आहे.
गेल्या वर्षभरात महापालिकेने नानाविध कार्यक्रम राबविले आहेत. शहर स्वच्छतेबरोबरच शौचालय बांधणी, ते जीपीएसवर आणणे, मॅरेथॅान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा भरवून स्वच्छ भारत मध्ये जनसहभाग वाढविला आहे.