- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - घणसोली परिसरात राहणाऱ्या व्यक्तीची ऑनलाईन ५३ लाखांची फसवणूक झाली आहे. ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याच्या आमिषाला भुलून त्यांनी पैसे भरले होते. सुरवातीला त्यांना ७०० रुपये नफा मिळाल्याने विश्वास ठेवून त्यांनी खात्यातील जमा रक्कम, कर्ज घेऊन ५३ लाख रुपये भरले होते.
ऑनलाईन टास्क करून १००, २०० रुपये कमवण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. केवळ व्हिडिओला लाईक केल्याने किंवा हॉटेलला रिव्हीव्यू दिल्याने पैसे मिळत असल्याने अनेकजण फसव्या टास्कला भुलत आहेत. त्यानंतर मात्र त्यांना टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून खाते रिकामे केले जाते. अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिकांमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत जागृकता नसल्याने गुन्हेगारांचा डाव साधत आहे. विशेष म्हणजे खात्यात लाखो रुपये असणारेच अशा गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत.
अशाच प्रकारात घणसोली येथे राहणाऱ्या व्यक्तीला ५३ लाखांचा चुना लागला आहे. त्यांना टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्याद्वारे त्यांनी सुरवातीला एक हजार रुपये कमवले. त्यानंतर मात्र टास्कसाठी पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी महिन्याभरात टप्प्या टप्प्याने तब्बल ५४ लाख रुपये भरले. त्यातून त्यांचा नफा होत असल्याचेही भासवले जात होते. यातून त्यांनी काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये काढून देखील घेतले. मात्र उर्वरित रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे अधिक ३० लाखांची मागणी करण्यात आली. यावरून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.