Navi Mumbai: एम. पोलिस ऍपचा राज्यासाठी विचार करू, पोलिस महासंचालकांकडून कौतुक
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 22, 2023 06:12 PM2023-08-22T18:12:09+5:302023-08-22T18:12:25+5:30
Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांसाठी एम. पोलिस हे अप्लिकेशन सुरु करण्यात आले असून त्याचा शुभारंभ पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
नवी मुंबई - नवी मुंबईपोलिसांसाठी एम. पोलिस हे अप्लिकेशन सुरु करण्यात आले असून त्याचा शुभारंभ पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी पोलिसांना खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवणाऱ्या व त्यांना एक क्लिकवर गरजेच्या सुविधा देणाऱ्या या अप्लिकेशनचे सेठ यांनी कौतुक केले. तसेच या अप्लिकेशनचा राज्यासाठी देखील विचार केला जाईल असे त्यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून पोलिस कर्मचारी ते अधिकारी सर्वांसाठीच एम पोलिस अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा करून सबळ पुरावे गोळा करण्यासाठी आय बाईक पथके तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यासाठी यथार्थ किट तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. तसेच पोलिसांच्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका व सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीसाठी व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते या सुविधांचे उदघाटन पोलिस आयुक्तालयात करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय मोहिते, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त संजयकुमार पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
एम पोलिस अप्लिकेशनच्या मदतीने पोलिस कर्मचारी मोबाईल मध्येच त्यांची रजा टाकण्यापासून ते सेवा पुस्तिका, गॅजेट व नोटीस, पगाराची पावती, रिवार्ड यांची माहिती मिळवू शकणार आहेत. त्याशिवाय रोजच्या बंदोबस्तापूर्वी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्या ऐवजी थेट नेमणुकीच्या ठिकाणी जाऊन मोबाईलवर हजेरी लावू शकणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच हे अप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. महासंचालकांनी देखील त्याचे कौतुक करत संपूर्ण राज्यात त्याचा वापर करता येईल या यासाठी विचार करू असे सांगितले. तसेच कोकणात मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या अमली पदार्थ प्रकरणी सखोल तपास सुरु असल्याचेही ते म्हणाले.
नवे पोलिस तंत्रज्ञानाने परिपूर्ण
दिवसेंदिवस तंत्रज्ञानात भर पडत असून, नवे भरती होणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी या तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. तर सायबर गुन्ह्यांचेही मोठे आव्हान आहे. गुन्हेगार देखील अद्यावत होत असल्याने तपासासाठी पोलिसही तांत्रिकदृष्टया जाणकार असला पाहिजे. शिवाय नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचेही मत महासंचालक रजनीश सेठ यांनी व्यक्त केले.