नवी मुंबई : ‘चला धावू या स्वच्छतेसाठी’ या शीर्षकाखाली महापालिकेच्या वतीने महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅरेथॉनच्या दोन्ही खुल्या गटाच्या विजेते पदावर पोलिसांनी बाजी मारली. १५ कि.मी. अंतराच्या पुरुष गटात प्रशांत सुर्वे तर महिला गटात वर्षा भवारी या विजेत्या ठरल्या आहेत.‘चला धावू या स्वच्छतेसाठी’ हा संदेश प्रसारित करीत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पामबीच मार्गावर झालेल्या पाच गटांतील या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामध्ये शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साही सहभाग होता. यावेळी मॅरेथॉनच्या मुख्य १५ कि.मी. अंतर पुरुषांच्या खुल्या गटात प्रशांत सुर्वे यांनी विजेतेपद पटकावले. ते नवी मुंबई पोलीस दलात असून कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गतवर्षीही त्यांनी महापौर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. मात्र थोडक्यात संधी गमवावी लागल्याने त्यांना दुसरा क्रमांक मिळाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली असतानाही जिद्दीच्या बळावर त्यांनी यंदा प्रसंगावर मात करीत विजेतेपद पटकावले, तर महिलांच्या खुल्या गटातून वर्षा भवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबईचा नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली. याप्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे, अभिनेत्री दीप्ती भागवत, संजय पाटील, नेत्रा शिर्के, प्रकाश मोरे, तनुजा मढवी, उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार, सुभाष इंगळे, बाबासाहेब राजळे, क्रिडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी उपस्थित होते.
पोलिसांनीच जिंकली नवी मुंबई मॅरेथॉन
By admin | Published: January 25, 2016 1:30 AM