नवी मुंबई महापौरांची सायकल सफारी
By Admin | Published: January 17, 2016 03:19 AM2016-01-17T03:19:51+5:302016-01-17T03:19:51+5:30
नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महापौरांनी अवलंबलेली सायकल सफारी सध्या चर्चेचा विषय बनत आहे. जाहिरातीमुळे प्रबोधन होत नसल्याचे पाहून त्यांनी
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महापौरांनी अवलंबलेली सायकल सफारी सध्या चर्चेचा विषय बनत आहे. जाहिरातीमुळे प्रबोधन होत नसल्याचे पाहून त्यांनी नवा पायंडा पाडला आहे.
ऐरोली, दिघा व रबाळे परिसरातील रहिवाशांना सुटबुट घातलेली व्यक्ती सायकलवर जाताना पाहून काहीसे आश्चर्य वाटत आहे. सायकलवर फिरणारी ती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे महापौर सुधाकर सोनवणे आहेत, हे कळल्यानंतर तर अनेकांचा त्यावर विश्वासही बसत नाही. शुक्रवारी संध्याकाळी ऐरोलीत सुरू असलेल्या भारत महोत्सवादरम्यान उपस्थितांनाही असाच काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. महापौरांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असतानाच एक सायकल गर्दीजवळ थांबली, तेव्हा समजते हे तर महापौर!
रबाळे येथे राहणारे महापौर सोनवणे यांनी लगतच्या परिसरात कार्यक्रमांना जाण्यासाठी सायकल वापरायला सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन व निरोगी आरोग्य हाच त्यांचा उद्देश आहे. प्रत्येक जण परिसरात फिरण्यासाठी वाहनांऐवजी पायी चालत गेल्यास किंवा सायकल वापरल्यास प्रदूषणाला आळा बसू शकतो. हेच सांगण्यासाठी त्यांनी थेट कृतीतून समाजापुढे नवा पायंडा पाडला आहे.
वाढत्या रहदारीमुळे निश्चित ठिकाणी पोहोचताना प्रत्येकाला वाहतूककोंडी व प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक परिसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरताना हा त्रास टाळण्यासाठी सायकलचा प्रवास उत्तम आहे.
- सुधाकर सोनवणे, महापौर