नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा दौरा रद्द

By कमलाकर कांबळे | Published: October 24, 2023 08:01 PM2023-10-24T20:01:33+5:302023-10-24T20:03:47+5:30

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क,  नवी मुंबई : मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ...

Navi Mumbai Metro missed again, Prime Minister's October 30 visit cancelled | नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा दौरा रद्द

नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा दौरा रद्द

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी मेट्रोचे उद्घाटनाचे नियोजन होते. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामालाही लागल्या होत्या. परंतु, पंतप्रधानांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन आता पुढे ढकलले आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या तारखा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या महिनाभरापासून तयारीत व्यस्त असणारे संबंधित विभागाचे अधिकारी हवालदिल झाले आहेत.

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह राज्यातील एक लाख महिलांचा भव्य मेळावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित केला होता. त्यासाठी मोदी उपस्थित राहणार होते. उद्घाटनाच्या तारखा तीन वेळा पुढे ढकलल्यानंतर ३० ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करून त्यानुसार सिडकोने युद्धपातळीवर तयारी सुरू केली होती. कार्यक्रमासाठी भव्य वातानुकूलित मंडप, पार्किंग आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा आराखडा तयार करून त्यावर पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून सिडकोने निविदाही मागविल्या आहेत. परंतु पंतप्रधानांचा नियोजित दौराच रद्द झाल्याचा संदेश सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने राज्य शासनाच्या संबंधित विभागाला प्राप्त धाडला. मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याची नवीन तारीख स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले गेल्याची चर्चा सिडकोत सुरू आहे.

Web Title: Navi Mumbai Metro missed again, Prime Minister's October 30 visit cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.