राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:10 AM2022-06-08T07:10:06+5:302022-06-08T07:10:26+5:30
Navi Mumbai : नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला.
नवी मुंबई : विविध कारणांमुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईमेट्रोला राज्यसभा निवडणुकीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सिडकोला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे; परंतु उद्घाटनासाठी संबंधित मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने मेट्रोचा प्रवास रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यावर पडदा पडला असून, राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच बहुप्रतिक्षित मेट्रोचे उद्घाटन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते.
नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा विडा उचलला. त्यानुसार मेट्रोचे रखडलेले काम पूर्ण करण्याबरोबरच त्याच्या संचालनाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली. वर्षभरात महामेट्रोने स्थापत्यविषयक कामे पूर्ण केली आहेत.
विशेषत: पेंधर ते बेलापूर मार्गावरील पेंधर ते खारघर (सेंट्रल पार्क) या पाच किमी अंतरावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली रेल्वे सुरक्षा मंडळाकडूनसुद्धा नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार सिडकोनेही तयारी पूर्ण केली आहे; परंतु उद्घाटनासाठी मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध न झाल्याने उद्घाटन रखडल्याचे बोलले जात आहे.
तारखेबाबत पाठपुरावा...
विशेष म्हणजे संबंधित मंत्र्यांची उद्घाटनासाठी तारीख मिळावी, यासाठी सिडकोकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील महिनाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सिडकोने दोनदा वेळ मागितली आहे.
अखेर राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच मेट्रोचे उद्घाटन उरकण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.