नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त
By कमलाकर कांबळे | Published: September 5, 2024 07:58 PM2024-09-05T19:58:27+5:302024-09-05T19:59:02+5:30
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तिकीट दरात कपात
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर ते पेंधर दरम्यानचा मेट्रोचा प्रवास स्वस्त झाला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोने तिकीट दरात ३३ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुधारित दरांनुसार आता तिकिटाचा किमान दर १० रुपये तर कमाल ३० रुपये इतका असणार आहे. ७ सप्टेंबरपासून तिकिटांचे नवीन दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.
बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. परंतु मेट्रोचे तिकीट दर जास्त असून, ते कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन विजय सिंघल यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मेट्रोच्या तिकीट दरात ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या ० ते २ किमी आणि २ ते ४ किमी अंतरासाठी १० रुपये भाडे लागणार आहे तर, त्यापुढील ४ ते ६ किमी आणि ६ ते ८ किमी अंतरासाठी २० रुपये तिकीट दर लागणार आहेत. ८ ते १० किमीच्या टप्प्यासह त्यापुढील प्रवासासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यानच्या अंतरासाठी तिकीट दर ४० रुपये इतका होता. नव्या दरानुसार याच अंतरासाठी प्रवाशांना आता ३० रुपये अदा करावे लागणार आहेत.
जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय म्हणून नवी मुंबई मेट्रोला पसंती दिली जात आहे. या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ घेता यावा, यादृष्टीने तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळ आणि लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाभ होईल.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको