नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला

By कमलाकर कांबळे | Published: November 16, 2023 08:15 PM2023-11-16T20:15:43+5:302023-11-16T20:16:12+5:30

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे.

Navi Mumbai Metro will run from today, CIDCO avoided the inauguration ceremony for public interest | नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला

नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला

नवी मुंबई : मंत्र्यांच्या तारखांअभावी मागील वर्षभरापासून रखडलेला नवी मुंबईमेट्रोचा प्रवास शुक्रवारपासून प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा शुक्रवारपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला.

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु, केवळ उद्घाटनाच्या सोपस्कारासाठी हा प्रवास रखडला आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याची योजना सिडकोने आखली होती. मात्र, पंतप्रधानांचा नियोजित नवी मुंबई दौरा रद्द झाल्याने हा मुहूर्त टळला. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याच वेळी मेट्रो सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांनी सिडकोच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यात नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनाची औपचारिकता न करता मेट्रो मार्ग क्रमांक १ वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश सिडकोला दिले. त्यानुसार १७ नोव्हेंबरपासून नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो सेवेचा शुभारंभ होत आहे.

दुपारी ३ वाजता धावणार पहिली मेट्रो
बेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकांतून दुपारी ३ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. तर शेवटची मेट्रो रात्री १० वाजता असेल. १८ नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १० वाजता होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

१० ते ४० रुपये असेल तिकीट दर
मेट्रोच्या तिकिटाचे दर हे अंतरानुसार निश्चित केले आहेत. त्यानुसार ० ते २ किमीच्या टप्प्यासाठी १० रुपये. तर २ ते ४ किमी अंतरासाठी १५ रुपये तिकीट दर असणार आहेत. ४ ते ६ किमी अंतरासाठी २० रुपये, ६ ते ८ किमीसाठी २५ रुपये तिकीट दर निश्चित केले आहेत. ८ ते १० किमी अंतरासाठी ३० रुपये आणि १० किमीपुढील अंतरासाठी ४० रुपये प्रवास भाडे आकारले जाणार आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्गावरील ११ स्थानके
सीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही ११ स्थानके या मार्गावर आहेत.

बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
- अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: Navi Mumbai Metro will run from today, CIDCO avoided the inauguration ceremony for public interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.