नवी मुंबई : टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी कंट्रोल रूम तयार करण्यात आला असून त्याचे उदघाटन मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
कामांचा खर्च वसूल होऊनही राज्यातले अनेक टोल सुरु असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. मात्र असे टोलनाके बंद करण्याची मागणी करूनही ते बंद होत नसल्याने नागरिकांची लूटमार सुरूच आहे. त्या विरोधात मनसेने आवाज उठवला असून, प्रत्येक टोलनाक्यावरून नेमकी किती वाहने ये जा करतात, हे तपासून त्याद्वारे किती टोल वसुली होत आहे याचे गणित मनसे बांधणार आहे.
त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार वाशी टोलनाका व ऐरोली टोलनाका येथे नवी मुंबई मनसेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. प्रत्येक लेनला एक कॅमेरा बसवला असून त्याद्वारे वाहन मोजणीसाठी ऐरोली व सीवूड येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी मनसे कार्यकर्ते २४ तास बसून टोल नाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांची नोंद ठेवणार आहेत. त्यानुसार गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या सीवूड येथील कक्षाचे उदघाटन मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्यावतीने ऐरोलीत देखील कक्ष सुरु करून ऐरोली टोलनाक्यावर नजर ठेवली आहे. पुढील पंधरा दिवस दोन्ही टोलनाक्यावर मनसेचे कॅमेरे सक्रिय राहून तिथून ये जा करणाऱ्या वाहनांची नोंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर समोर येणारी आकडेवारी न्यायालयापुढे मांडली जाणार आहे.