- योगेश पिंगळे
नवी मुंबई : वाशी येथील हॉटेलमध्ये बुधवारी एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इव्हेन्ट ऑर्गनायझरसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजविण्याची हॉटेल चालकांना विनंती केली. परंतु हॉटेल चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना वाशी येथे घडली आहे.
वाशी येथील एका हॉटेलमध्ये एका खाजगी कंपनीच्यामाध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेलमध्ये हिंदीसह आदी भाषेतील गाणी सुरु होती. इव्हेन्ट ऑर्गनायझर आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणी वाजविण्याची विनंती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे केली. परंतु या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वारंवार विनंती करूनही मराठी गाणी वाजविण्यासाठी नकार दिला जात असल्याची बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी हॉटेल चालकाला देखील मराठी गाणी वाजविण्याची विनंती केली परंतु यावेळी देखील हॉटेल चालकाने देखील मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना घडली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून हॉटेल विरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. याघटनेनंतर हॉटेल संचालकांनी गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे.