- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - खारघर येथील मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखा पोलिसांनी उलगडा केला आहे. परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. यानुसार त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांनी यापूर्वीही परिसरात छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या असून तक्रार दाखल नसल्याने त्यांना गुन्ह्यासाठी बळ मिळत गेले होते.
खारघर सेक्ट ३४ येथील धनलक्ष्मी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरीची घटना घडली होती. यामध्ये सुमारे चार लाखाचे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याद्वारे खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक सतीश भोसले, उपनिरीक्षक राहुल भदाणे, सचिन टिके, अनिल यादव, शशिकांत शेंडगे आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता संशयित तिघांची माहिती मिळाली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा पोलिस परिसरात पाळत ठेवून असतानाच ते मिळून आले. अधिक चौकशीत तिघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले.
सेक्टर ३४ परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारे असून १७ ते १८ वयोगटातले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे चोरीला गेलेले सर्वच मोबाईल हस्तगत केले आहेत. गुन्हा करण्यासाठी रात्रभर जागल्यानंतर ते दिवसभर झोपून होते. झोपेतून उठल्यानंतर संध्याकाळी ते बिनधास्त परिसरात वावरत असताना पोलिसांना मिळून आले. चौकशीत त्यांनी मोबाईल दुकान लुटल्याची तसेच इतरही छोट्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.