कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या आजारानं चिंतेत भर टाकली आहे. नवी मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. नवी मुंबईत तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 29 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे नवी मुंबई मनपा हद्दीतील आहेत. तर इतर 15 रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी मुंबईतील हे रुग्ण 10 मे नंतर आढळले आहेत. सर्व रुग्णांवर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे.