नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:10 AM2019-07-17T00:10:24+5:302019-07-17T00:10:41+5:30
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची शासनाने बदली केली आहे.
नवी मुंबई : महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची शासनाने बदली केली आहे. २ वर्षे ४ महिन्याच्या कार्यकाळात आयुक्तांनी महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले होते. आकृतिबंधास मंजुरी मिळवून देण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानावरही ठसा उमटवला.
शासनाने मार्च २०१७ मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करून त्यांच्या जागेवर डॉ. रामास्वामी एन यांची नियुक्ती केली होती. मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील समन्वय कमी झाला होता. अशा परिस्थितीमध्ये रामास्वामी एन. महापालिकेचा कारभार कसा करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आयुक्तांनी पहिल्याच दिवशी मुंढे यांची चांगली कामे पुढे सुरूच ठेवणार व सर्र्वांना विश्वासात घेवून व कोणत्याही दबावाला बळी न पडता कामकाज करणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेमधील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले व उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कार्यकाळात महापालिकेने जवळपास २५०० कोटी रुपये मुदतठेवीमध्ये गुंतविले आहेत. २०१६ - १७ मध्ये १८३८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. २०१८ - १९ मध्ये तब्बल २०६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
आयुक्तांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे हे शक्य झाले होते. आयुक्तांच्या कार्यकाळात दोन वर्षे महापालिकेने सातत्याने स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई हे राज्यातील एकमेव महापालिकेचा समावेश झाला होता. घनकचरा व्यवस्थापन व नागरिकांचा प्रतिसाद या विभागामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला.
>कार्यकाळातील पैलू
महापालिकेने प्रथमच २०६४ कोटी रुपयांचा कर संकलित केला
जवळपास २५०० कोटी रुपये मुदत ठेवीमध्ये गुंतविले
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईची निवड
महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू केले
महापालिकेच्या आरोग्य व अग्निशमन दलामध्ये कर्मचारी भरती
प्रत्येक नोडमधील विकासकामांची घटनास्थळी जावून पाहणी