नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १४ विनापरवाना शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:45 AM2018-04-07T06:45:45+5:302018-04-07T06:45:45+5:30
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नवी मुंबई - महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा बंद कराव्यात अशा सूचना शिक्षण मंडळाने संबंधित संस्थांना करूनही त्या सुरूच राहत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली स्पर्धा पाहता अनेक संस्थांकडून व्यावसायिक उद्देश साध्य करण्यासाठी शाळा सुरू केल्या आहेत. वेगवेगळ्या बोर्डाच्या शिक्षणाचे दिवास्वप्न दाखवून पालकांकडून पाल्याच्या शिक्षणासाठी भरमसाट शुल्क आकारले जात आहे. यामुळे पूर्णपणे बाजारीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रात आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी विनापरवाना शाळा चालवल्या जात आहेत. परवानगीची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असल्याचे सांगून त्याठिकाणी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाते. अशा शाळा बंद झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा शाळा सुरू होत असतानाच त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने वर्षानुवर्षे अशा शाळा चालवल्या जात आहेत.
सद्य:स्थितीला महापालिका क्षेत्रात १४ प्राथमिक शाळा विनापरवाना असल्याचे शिक्षण मंडळाने उघड केले आहे. त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या १३ तर मराठी माध्यमाची एक शाळा आहे. त्यापैकी नेरुळमधील राईट वे इंग्लिश स्कूल व घणसोलीतील सरस्वती विद्यानिकेतन स्कूल यांचे परवानगी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
विनापरवाना शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आगामी वर्षाकरिता लगतच्या मान्यताप्राप्त खासगी शाळेत अथवा महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावेत, असेही सूचित केले आहे.
महापालिकेकडून प्रतिवर्षी अशा अनधिकृत शाळांची यादी घोषित करून त्याठिकाणी पाल्याचे प्रवेश न घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र, आजवर प्रवेश प्रक्रिया उरकल्यानंतर अशा शाळांची यादी घोषित करून औपचारिकता पूर्ण झालेली आहे. शिक्षण मंडळाच्या भूमिकेवर यापूर्वी टीकादेखील झालेली आहे.
यंदा मात्र प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अनधिकृत शाळांची यादी घोषित करून पालकांना सतर्क करण्यात आलेले आहे. शिवाय विनापरवाना सुरू असलेल्या
शाळा बंद कराव्यात, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही शिक्षण मंडळाने संबंधित संस्थांना दिला आहे.
कठोर कारवाईची गरज
विनापरवाना चालणाऱ्या खासगी शाळांची प्रतिवर्षी यादी घोषित केली जाते. व्यवसायी गाळे, रहिवासी जागा, रो हाउस, अनधिकृत इमारती अशा ठिकाणी सोयीनुसार या शाळा चालवल्या जातात; परंतु अनधिकृत शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने वर्षानुवर्षे त्या सुरूच असतात, तर पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीही होत असते. त्याला भुलून अनेक जण आपल्या पाल्याचा नकळतपणे अनधिकृत शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विनापरवाना शाळांवर ठोस कारवाईची गरज आहे. त्याकरिता पालिकेच्या शिक्षण मंडळाने ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
सी.बी.डी. बेलापूरमधील अल मोमिन स्कूल, नेरुळ येथील राईट वे इंग्लिश स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल, रेड कॅमल इंटरनॅशनल स्कूल, इकरा इंटरनॅशनल स्कूल, तुर्भे स्टोअर येथील नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल, कोपरखैरणेमधील आॅस्टर इंटरनॅशनल स्कूल, विश्वभारती स्कूल, महापे येथील आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, घणसोली सेक्टर ५ येथील सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, चिंचआळी येथील सेंट जुडे स्कूल, अचिवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कूल, रबाळे येथील इलिम इंग्लिश स्कूल व प्रशिक इंग्लिश स्कूल अशी या विनापरवाना शाळांची नावे आहेत.