नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:53 PM2020-03-11T23:53:54+5:302020-03-11T23:54:14+5:30

महासभेने केली ४५० कोटींची वाढ : अनेक नगरसेवकांची दांडी

Navi Mumbai Municipal Corporation approves Rs 2 crore budget | नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

Next

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महासभेने ४५० कोटींची वाढ सुचवून ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती आणि महासभेने वाढ केलेली रक्कम ७५० कोटी झाली आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला अनेक नगरसेवक अनुपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी १८ फेब्रुवारी रोजी २०२०-२१ या वर्षासाठीचे ३८५० कोटी रु पयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभेत सादर केले होते. त्यानंतर या अर्थसंकल्पावर स्थायी समिती सभेत चर्चा करून ३०० कोटी रु पयांची वाढ करण्यात आली होती. बुधवार, ११ मार्च रोजी संपन्न झालेल्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी सदर अर्थसंकल्प महासभेत मांडला. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्प मांडलेल्याच दिवशी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. महापालिकेत निवडून आलेले १११ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर फक्त १८ सदस्यांनी चर्चा करून विविध नागरी विकासकामांच्या सूचना आणि उत्पन्नात वाढ सुचविली. सदस्यांनी नाला व्हिजन, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पार्किंग, उद्यानांचा विकास, पर्यटनस्थळांचा विकास, मार्केट, रस्ते आदी विषयांवर चर्चा केली. तर अनेक नगरसेवकांनी मागील अर्थसंकल्पात मांडलेली कामे अद्याप झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्या वतीने अर्थसंकल्पात वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी मागील अर्थसंकल्पातील तरतुदी प्रशासन बदलल्याने राहून गेल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले असून, भरती प्रकिया आणि साहित्य खरेदीला प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याचा आरोप महापौर सुतार यांनी केला.

सेना नगरसेवकांवर गटनेत्यांची नाराजी
अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळताना भाजपचे ३५ आणि शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर आणि नगरसेविका नंदा काटे दोनच नगरसेवक उपस्थित होते. सभागृहात महासभेला न बसणाऱ्या शिवसेना नगरसेवकांबद्दल शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी नाराजी व्यक्त करीत अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर नगरसेवकांना गांभीर्य नसल्याचे ते म्हणाले. याबाबत वरिष्ठांना कल्पना देणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.

पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम
सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक आणि महापालिकेतील विविध पदे आमदार गणेश नाईक यांच्यामुळे मिळाली असून नाईक यांनी आमचे कुटुंबीय आणि दिघावासीयांवर वडिलांप्रमाणे प्रेम केले आहे. त्यामुळे नाईक यांची साथ आम्ही तीनही नगरसेवक आणि आमच्या प्रभागातील नागरिक कधीही सोडणार नसल्याचे स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी स्पष्ट करीत गवते यांच्या पक्षांतर करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation approves Rs 2 crore budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.