नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये; स्वच्छतेच्या कामांची पहाटे ६ पासून पाहणी
By नामदेव मोरे | Published: March 16, 2023 06:30 PM2023-03-16T18:30:36+5:302023-03-16T18:30:46+5:30
स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा निर्धार नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे.
नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा निर्धार नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. शहर स्वच्छतेच्या कामांकडे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काटेकोरपणे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पहाटे सहा पासून आयुक्त स्वत: विविध विभागांना भेट देऊन कामांची पाहणी करत आहेत. स्वच्छतेमधील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांना देण्यात आला आहे. डेब्रीजचे अतिक्रमण रोखण्यात यावे. उघड्यावर शौचास जाणारांवर कारवाई करावी असे आदेशही दिले असून आयुक्तांच्या दक्षतेमुळे स्वच्छतेच्या कामांना गती आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात तीसरा क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कोणत्याही स्थितीमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी शहर स्वच्छतेच्या कामांचे नियोजन केले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर शहरातील दैनंदिन साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, सुशोभीकरणाची कामे यांचा नियमीत आढावा घेत आहेत. पण फक्त कागदावरील आढाव्यावर व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून न राहता प्रत्यक्षात फिल्डवर जावून प्रत्येक कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटे सहा वाजलेपासून आयुक्त शहरातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. गुरूवारी दिघा व ऐरोली विभागाची पाहणी केली. झोपडपट्टी परिसरात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात यावे अशा सूचना केल्या. आयुक्तांनी दौऱ्या दरम्यान उघड्यावर लघुशंका करणारांवर १ हजार रुपयांची दंडात्तक कारवाई केली.
ऐरोली सेक्टर ८ व ३० ए मधील हायटेंशन वायरखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज आणून टाकले जात आहे. डेब्रीज टाकणारांवरील कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले. स्वच्छताविषयी सुरू असलेल्या कामांकडे दुर्लक्ष केलेले खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
आयुक्त स्वत: कामांची पाहणी करत असल्यामुळे ठेकेदारांसह अधिकारी, कर्मचारीही दक्ष झाले आहेत. गुरूवारी केलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते.