नवी मुंबई मनपा मुख्यालयातील कर्मचारी लेट लतीफ, ११ वाजेपर्यंत खुर्च्या रिकाम्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:00 AM2020-12-10T01:00:51+5:302020-12-10T01:03:41+5:30
Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका मुख्यालयात कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी अनेक विभागांत ११ वाजल्यानंतर कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, वेळेवर कामावर न येणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर हजर होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. बुधवारी काही दक्ष नागरिकांनी मनपा मुख्यालयात जाऊन पाहणी केली असता, अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे निदर्शनास आले. मनपा मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची सकाळी पावणेदहा ते सायंकाळ सहा अशी कामाची वेळ आहे. एलबीटी, वाहन, उद्यान विभागातील कर्मचारी ११ वाजले, तरी कामावर हजर नव्हते. १२ वाजेपर्यंत अनेक जण कामावर येत असल्याचेही निदर्शनास आले. मनपा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसतील, तर मुख्यालयाबाहेर विभाग कार्यालय, रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, एनएमएमटी येथील अधिकारी व कर्मचारी कसे वेळेवर येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आयुक्तांनी पाहणी करावी
यापूर्वी महापौर व आयुक्तांनीही प्रवेशद्वारावर उभे राहून कोण वेळेवर येते व कोण उशिरा येते, याविषयी माहिती घेतली होती. तुकाराम मुंढे आयुक्तपदावर असताना वेळेत जागेवर उपस्थित नसणाऱ्यांवर निलंबित करण्याची कार्यवाहीही केली होती. विद्यमान आयुक्तांनीही कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
मनपा मुख्यालयात व विभाग कार्यलयांमध्येही अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत. बुधवारी मुख्यालयातील अनेक विभागांत ११ वाजल्यानंतरही कर्मचारी उपस्थित नव्हते. रिकाम्या खुर्च्यांच्या छायाचित्रांसह निवेदन आयुक्तांना देऊन उशीरा येणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
- सचिन कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते