नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बालवैज्ञानीक घडविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग व प्रकल्प करून घेतले जात आहेत. तालुकास्तरावरील विज्ञान परिषदेमध्ये सहभागी झालेल्या २५ शाळांमधील ७५ प्रकल्पांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली असून या सर्व बालवैज्ञानिकांचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि एडब्ल्यूएस इनकम्युनिटीस या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्याकडून विविध प्रयोग करून घेतले जात आहेत. नुकत्याच ठाणे तालुका पातळीवरील विज्ञान परिषदेमध्ये यामध्ये महानगरपालिका शाळांमधील ६ वी ते आठवी च्या २५ शाळांमधील विद्यांनी सहभाग घेतला होता.
नवी मुंबई मनपा शाळांच्या ७५ प्रकल्पांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. एकूण ४२४ प्रकल्पांपैकी २८३ प्रकल्पांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली असून यामध्ये नवी मुंबईचे विक्रमी ७५ प्रकल्प आहेत. २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हा स्तरावरील स्पर्धा होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बालवैज्ञानिक घडविण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. महानगरपलिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले आहे.