नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. भिंतींवर चित्रे काढण्यापासून ते कचरा संकलनापर्यंत सर्व पातळीवर परिश्रम घेतले जात आहेत. अभियानाचे यश लोकसहभागावर अवलंबून असणार आहे. यामुळे स्वच्छतेचे महत्त्व ५ लाख ३८ हजार कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून या चळवळीमध्ये राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व प्रत्येक नागरिकांचे सहकार्य हवे आहे. लोकसहभाग वाढल्यास देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
सायन-पनवेल महार्गावरील उड्डाणपुलाच्या बकाल भिंतींवर चित्रे रेखाटण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अस्वच्छ असणाऱ्या या परिसराचा चेहरा बदलू लागला आहे. सानपाडा ते एपीएमसी दरम्यान फेरीवाल्यांचे अतिक्रमण असलेल्या पदपथावरील अतिक्रमण दूर झाले असून मॅफ्कोच्या संरक्षण भिंती चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणावरून जाताना दुर्गंधीमुळे श्वास घेतानाही त्रास होत होता तेथील भिंतीही रंगवल्यामुळे सेल्फी घेण्यासाठी रांगा लागू लागल्या आहेत. स्वच्छता अभियान २०२१ला महानगरपालिकेने गती देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
स्वच्छतेची चळवळ सुरू झाली असून या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नागरिकांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छता मोहिमा यामध्ये किती सहभाग घेतला. स्वच्छतेविषयी नागरिकांना काय वाटते याला विशेष महत्त्व असणार आहे. यामुळे नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.गृहनिर्माण सोसायटीने ओला व सुका कचरा वेगळा करावा. ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास त्यावर सोसायटीमध्येच खतनिर्मिती करावी. प्रभागात स्वच्छता मोहिमांचे आयोजन केल्यानंतर नागरिकांनी सहभागी व्हावे.