कचरामुक्त शहरांत नवी मुंबई महापालिका राज्यात अव्वल; आयुक्तांनी केले नागरिकांचे अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:32 AM2020-05-20T06:32:40+5:302020-05-20T06:33:07+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३ वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये सर्वेक्षण केले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती.
नवी मुंबई : 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणाºया स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. यात नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील ६ शहरांना कचरामुक्त शहराचे पंचतारांकित रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३ वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये सर्वेक्षण केले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता विविध ठिकाणांना भेटी देत तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले होते. अशा सर्वंकष पाहणीच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यात आले आहे.
नवी मुंबईसह मध्य प्रदेशमधील इंदूर, कर्नाटकमधील मैसूर, गुजरातमधील सुरत व राजकोट आणि छत्तीसगढमधील अंबिकापूर ही देशातील शहरे पंचतारांकित रेटिंगची मानकरी ठरली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये स्वच्छ शहरात राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन महापालिकेस प्राप्त झाले होते. शहराच्या फाइव्ह स्टार रेटिंगबद्दल समाधान व्यक्त करीत पालिका आयुक्त मिसाळ यांनी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासह सर्वांचे अभिनंदन केले.
नवी मुंबई शहर स्वच्छ व आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी घरातच थांबून व सोशल डिस्टन्सिंग राखून आपले योगदान द्यावे. यापुढील काळात पंचतारांकित रेटिंगच्या पुढे जात आपली सेव्हन स्टार रेटिंग प्राप्त करण्यासाठी वाटचाल राहील.
अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका