नवी मुंबई - महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ करिता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सोसायटी, हाॅटेल, शाळा, हाॅस्पिटल व मार्केट या गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मनपाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन, स्वच्छतेविषयी व्यापक स्वरूपात माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती करण्यात येत आहे. रहिवाशांना कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रिया, तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करणे, तसेच या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून नागरिकांच्या स्वच्छताविषयक सवयींमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा आणि कोरोना आजाराचा प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन, असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दि. २ ते २० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.स्पर्धेमध्ये विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व ११ हजार रुपये अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह वितरित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे, महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे ५१ हजार, ४१ हजार व ३१ हजार रोख बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांच्यासह प्रदान केली जाणार आहेत. स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खासगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे १५ हजार व ११ हजार रोख बक्षिस, तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खासगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे २५ हजार व २१ हजार रोख बक्षिस हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे. मार्केट स्पर्धेकरिता प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या मार्केटना अनुक्रमे २५ हजार व २१ हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी, हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून, निकोप स्पर्धेतून नागरिकांना प्रेरणा मिळावी, याकरिता आयोजित स्वच्छता स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ व ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ यशस्वीपणे राबविण्यात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. - अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त