नवी मुंबई : लसीचा तुटवडा असल्यामुळे नवी मुंबईतही वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर मागवून चार लाख लसींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, याविषयीची कार्यवाही सुरू केली आहे.
नवी मुंबईमध्येही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने पोलीस, सुरक्षाकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योद्धे, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक व १ मे पासून १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या १५ लाख आहे. १८ वर्षांवरील लोकसंख्या जवळपास १० लाख ८० हजार आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ५१ हजार ३५५ जणांना लस देण्यात आली आहे. जवळपास ५८ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अद्याप ८ लाख २९ हजार नागरिकांना दुसरा डाेस देणे प्रलंबित आहे. लसीचा तुटवडा असल्यामुळे शासनाकडून पुरेसी लस मिळत नाही. यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत आहे.
शहरात लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. चार लाख लसींची खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लस उत्पादकाने ५० टक्के साठा केंद्र सरकारला देणे अपेक्षित आहे. उर्वरित खासगी कंपन्यांना देणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेला शासनाकडून लस मिळत आहे. पुरेशी लस मिळत नसल्यामुळे लसीकरणात अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी ग्लोबल टेंडर मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याविषयी निवीदा प्राक्रिया राबविली जाणार आहे.शासनाकडून पुरेसी लस मिळत नाही. यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत आहे.