नवी मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय, स्मशानभूमीत पर्यावरणपूरक ‘ब्रिकेट’ वापरणार
By नारायण जाधव | Published: February 22, 2024 12:35 PM2024-02-22T12:35:39+5:302024-02-22T12:36:00+5:30
महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे
नवी मुंबई : शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धनात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी येणारी प्रेते जाळण्यासाठी ब्रिकेटचा अवलंब करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. झाडे आणि उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या ब्रिकेटमुळे नवी मुंबईतील महागडे सरपण वाचवण्यास मदत होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले.
महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे. हे राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येचे निराकरण करू शकते, असे कुमार म्हणाले. “केंद्राने उत्तरेकडील राज्यांना हा प्रकल्प तपासण्यास सांगावे कारण शेतातील कचऱ्याचा वापर करून ब्रिकेट बनवता येतात,” असे कुमार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मनपाने तुर्भे घनकचरा व्यवस्थापन सुविधेवर किंवा बेलापूर येथे आणि फक्त दोन कोटी रुपये खर्चून स्वतःचे ब्रिकेट प्लांट उभारण्याच्या विचारात आहे. मनपाने तुर्भे स्मशानभूमीत ब्रिकेटसह एक पथदर्शी प्रकल्प सुरू करणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्मशानभूमीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाईल.
राज्यातील ऊस क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध आहे आणि शहरातील वृक्षतोड आणि छाटणीमध्ये भरपूर कचरा निर्माण होतो. यामुळे एकाच झटक्यात दोन समस्या - स्मशानभूमीत सरपण निर्माण करणारा धूर आणि कचरा विल्हेवाट - सुटतील असे कुमार म्हणाले
काही कुटुंबांना इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालणारी स्मशानभूमी वापरण्यास काही कारणांमुळे संकोच करतात, त्यांचे ब्रिकेट निराकरण करतील, असा महापालिकेस विश्वास आहे.