नवी मुंबई महानगरपालिकेचा विक्रमी ७१६ कोटी मालमत्ताकर जमा; गतवर्षीपेक्षा ८३ कोटी अधिक वसूली
By नामदेव मोरे | Published: April 1, 2024 07:15 PM2024-04-01T19:15:50+5:302024-04-01T19:17:21+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षभरात मालमत्ताकराच्या माध्यमातून ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर प्राप्त झाला आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षभरात मालमत्ताकराच्या माध्यमातून ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर प्राप्त झाला आहे. गतवर्षीपेक्षा ८३ कोटी ६६ लाख रुपये जादा कर वसूल झाला असून वर्षअखेरीस शेवटच्या तीन दिवसात ४१ कोटी २६ लाख कर संकलन झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. महानगरपालिकेने दोन दशकांपासून करवाढ केलेली नाही.नवीन मालमत्ता संकलनाच्या कक्षेत आणून उत्पन्नामध्ये वाढ करण्यात येत आहे. गतवर्षी ६३३ कोटी ३१ लाख रुपये मालमत्ता कर संकलीत झाला होता.
२०२३ - २४ वर्षामध्ये जास्तीत जास्त कर संकलन करण्यासाठी वर्षभर नियोजन करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी करवाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. वर्षअखेरीस नवीन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही कर संकलनावर लक्ष केंद्रीत केले होते. यावर्षी ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर वसुल करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा ८३ कोटी ६६ लाख रुपये जास्त कर जमा झाला असून मार्चमहिन्यात १६३ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेने कर संकलनासाठी १ त ३१ मार्च दरम्यान अभय योजना लागू केली होती. २० मार्च पर्यंत थकीत कर भरणाऱ्यांना दंड रक्कमेवर ७५ टक्के सवलत दिली होती. शेवटच्या दहा दिवसात दंड रकमेत ५० टक्के सवलत दिली होती. शहरातील ८७४० थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. कर वसूलीसाठी पाठपुरावा केला होता. अभय योजनेलाही प्रतिसाद मिळाला असून ४५ कोटी ५६ लाख रुपये थकीत कर वसूल झाला आहे.
सुट्टीच्या दिवशीही सुरू होते कार्यालय
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन दिवस सुट्टी होती. परंतु महानगरपालिकेची आठ विभाग कार्यालय व मुख्यालयातील कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. २९ मार्चला २८ कोटी ७८ लाख रुपये, ३० मार्चला ८ कोटी ३८ लाख रुपये व ३१ मार्चला ४ कोटी १० लाख रुपये कर संकलन झाले आहे. शेवटच्या तीन दिवसात ४१ कोटी २६ लाख रुपये कर संकलन झाले असून यासाठी मालमत्ता कर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.