- योगेश पिंगळे नवी मुंबई : सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील न्यायालयातील वकील, कर्मचारी तसेच नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे.
बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमधील तळ मजल्यावरील एका स्वतंत्र खोलीत दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या दवाखान्यामध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करण्यात येणार असून या दवाखान्याची वेळ कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५;३० वाजेपर्यंत आहे. महापालिकेच्या माध्यमातून या दवाखाण्यात एक डॉटर, एक ब्रदर आदी मनुष्यबळ पुरविण्यात आले असून १ बेड, व्हील चेयर, बीपी ऑपरेटर आदी प्रथमोपचारासाठी लागणारे महत्वाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बेलापूर न्यायालयाचे ठाणे जिल्हा न्यायाधीश पी.ए. सहाणे, संयुक्त दिवाणी न्यायाधीश पी.पी. आवटे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, डॉ.अजय गडदे, डॉ.गजानन मिटके, महापालिकेचे बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल आदी मान्यवर आणि नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.