नवी मुंबई महापालिकेकडून कर्करोग तपासणी, महिलांसाठी विशेष शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 03:12 AM2019-11-25T03:12:53+5:302019-11-25T03:13:26+5:30
महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई : महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणी महागड्या तपासण्या मोफत होणार असल्याने शहरातील गोर-गरीब महिलांना दिलासा मिळणार असून सदर प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली आहे.
कर्करोग आजाराचे प्रमाण महिलांमध्ये वाढत असून विविध तपासण्या महाग असल्याने अनेकवेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोफत तपासण्यांच्या माध्यमातून वेळेत उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील महिला, मुली महापालिका कर्मचारी, नगरसेविका आदींना शिबिराचा लाभ घेता येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून २०१७ - १८ या आर्थिक वर्षात शहरात २५ ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ९७९ महिलांनी लाभ घेतला होता. यंदा आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात ओरल आणि सरवायव्हल कर्करोग शिबीर आयोजित करण्यात आले असून विविध चाचण्या आणि उपचाराचा लाभ घेता येणार आहे. शिबिरातील चाचण्याबरोबर ब्रेस्ट कॅन्सरची देखील तपासणी व्हावी अशी मागणी या विषयावर स्थायी समिति सभेत झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी केली.
शहरात ११३ ठिकाणी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या ११३ शिबिरांपैकी ६८ शिबिरे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून निशुल्क राबविण्यात येणार आहे.
शिबिरासाठी सुमारे ३५ लाखांचा खर्च
महापालिकेला ४५ शिबिरांकरिता प्रति शिबीर ६७ हजार रु पये खर्च येणार आहे. यासाठी एकूण ३० लाख १५ हजार रु पये खर्च आकाराला जाणार आहे. त्यासोबत इतर खर्च मिळून महापालिकेला शिबिरांसाठी एकत्रित सुमारे ३५ लाख रु पये खर्च येणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितिच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला कर्करोग शिबिराच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.