महापालिका करणार मातृभाषेचा जागर; नागरिकांनो, तुम्हीही सहभागी व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 01:14 PM2024-01-14T13:14:12+5:302024-01-14T13:14:29+5:30
या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
नवी मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून साहित्यप्रेमी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात मान्यवरांच्या व्याख्यानासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील मराठी साहित्यप्रेमाला वाव देऊन नानाविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या कार्यक्रमांतून मातृभाषेचा प्रचार-प्रसार होऊन कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा, अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
मान्यवरांची व्याख्याने
१६ जानेवारीला सकाळी ११ वाजता महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक प्रल्हाद जाधव यांचे कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने वाणी, भाषा, लेखणी आदी विषयांवर व्याख्यान देणार आहेत.
१९ जानेवारीला लेखक, निवेदक डॉ. मृण्मयी भजक या ‘अमेरिका खट्टी मिठी’ या नाट्य अभिवाचनात्मक कार्यक्रमातून मराठी चष्म्यातून आंबटगोड अमेरिकेची सफर घडविणार आहेत. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग असावा, यादृष्टीने त्यांच्याकरिता ३ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
यातील पहिली स्पर्धा उपक्रम २३ जानेवारीला सकाळी ११ पासून राबविला जात असून, ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ होणार आहे. ५ मिनिटांत विचार मांडायचे आहेत. दुसरी स्पर्धा मराठी कवितेचा समृद्ध वारसा यात पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवडलेल्या कवितेचे सादरीकरण करायचे आहे.