लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात ५० हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. यासाठी सामाजिक संस्थांसह गृहनिर्माण सोसायट्यांचीही मदत घेतली जाणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून नेरूळ येथील ज्वेल आॅफ नवी मुंबई परिसरात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आयुक्तांनी नवी मुंबईकर नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियाना’अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या पावसाळ्याच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील विविध जागा तसेच मोरबे धरण परिसर या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकसहभागालाही महत्त्व दिले जात असून विविध सोसायट्यांनी मागणी केल्यास त्यांनाही मोफत वृक्षरोपे दिली जाणार आहेत.
या वेळी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आदी उपस्थित होते. बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.संकल्प करण्याचे आवाहनच्कोरोनाविरोधातील लढाईच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व अधिक लक्षात आले आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी या कालावधीत वृक्षारोपण करावे; यापुढील काळात आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणशील शहर म्हणून अधिक नावाजले जाईल, अशा प्रकारचा संकल्प करण्याचे आवाहन केले.