Navi Mumbai: नवी मुंबईतील पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय पातळीवर दखल, दिल्लीतील कार्यशाळेत आयुक्तांकडून सादरीकरण
By नामदेव मोरे | Published: July 19, 2024 07:27 PM2024-07-19T19:27:19+5:302024-07-19T19:27:49+5:30
Navi Mumbai News: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुंबईतील यंत्रणेचे कौतुक केले.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुंबईतील यंत्रणेचे कौतुक केले.
स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यामध्येही पुरेसे पाणी पुरविणे शक्य होत आहे. मे अखेरीस खबरदारी म्हणून आठवड्यातून तीन दिवस सायंकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवला असला तरी सकाळी सातही दिवस पुरेसे पाणी शहरवासीयांना पुरविले जात होते. महानगरपालिकेने २४ तास पाणी पुरवठा करण्याची यंत्रणा कार्यान्वीत केली असून उन्हाळा वगळता अनेक भागात प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. सर्व भागात टप्याटप्याने चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवरील नियंत्रणात्मक स्काडा प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. पाणी देयक भरणे अधिक सुलभ करण्यासाठी युपीआय व क्यूआर कोडद्वारे देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थापन प्रणालीचे केंद्र स्तरावर दखल घेतली आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने अमृत २ प्रकल्पाअंतर्गत विज्ञान भवन येथे नळातून पेयजल या राष्ट्रीय कार्यशाळेत नवी मुंबईतील नावीण्यपूर्ण जलदेयके व संकलन यंत्रणा या विषयावर सादरीकरण करण्यास नवी मुंबईच्या प्रतिनिधींना आमंत्रीत केले होते. आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी या कार्यशाळेत पाणी पुरवठा योजनेविषयी सादरीकरण केले. अमृत प्रकल्पाच्या राष्ट्रीय मिशन संचालक डी. थारा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेस देशभरातील विविध शहरांमधील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. देशभरातील अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील पाणी पुरवठा यंत्रणेचे कौतुक केले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता वसंत पडघन, स्वप्निल देसाई उपस्थित होते.