दोन वर्षे ‘तो’ फसवत राहिला, 54 कोटींच्या मुदतठेवी हडपल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:11 AM2024-06-12T07:11:16+5:302024-06-12T07:11:44+5:30
Bank Fraud News: सुमन शर्मा नावाची व्यक्ती २०२२ पासून स्वतःला बँकेचा शाखाधिकारी असल्याचे सांगत बाजार समितीत येत होती. शर्मा बाजार समितीच्या कार्यालयातून धनादेश घेऊन जात असतानाही कोणालाही त्याबाबतची खात्री करावीशी वाटली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवी मुंबई - युको बँकेचा शाखाधिकारी असल्याचे सांगत एक भामटा कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीत येतो. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतो. विशेष म्हणजे तेथील अधिकारीही कोणतीही विशेष शहानिशा न करता त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यानंतर तो वेळोवेळी स्वत:च बाजार समितीत येतो आणि कोट्यवधी रुपयांचे धनादेश स्वत:च घेऊन जात बाजार समितीच्या युको बँकेतील खात्यात मुदत ठेव म्हणून ठेवल्याचे सांगतो. मात्र दोन वर्षांनंतर बाजार समिती प्रशासनाला जाग येते आणि त्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५४ कोटींच्या ठेवींची रक्कम बाजार समितीच्या बँक खात्यात नव्हे तर त्याच बँकेत दुसऱ्याच खात्यात भरल्याचे आणि त्यापोटी व्याजासह ५४ कोटी २७ लाख हडपल्याचे लक्षात येते.
एका हिंदी सिनेनातील कथानकापेक्षाही मोठी धक्कादायक स्टोरी या घटनेमुळे उघड झाली आहे. सुमन शर्मा नावाची व्यक्ती २०२२ पासून स्वतःला बँकेचा शाखाधिकारी असल्याचे सांगत बाजार समितीत येत होती. शर्मा बाजार समितीच्या कार्यालयातून धनादेश घेऊन जात असतानाही कोणालाही त्याबाबतची खात्री करावीशी वाटली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांच्यामार्फत समितीच्या बँक खात्यांची व ठेवींची पडताळणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार निकम यांच्या तक्रारीवरून सुमन शर्मा नावाच्या व्यक्तीवर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष दोन मार्फत अधिक तपास केला जात आहे.
ठेवींकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न
बाजार समितीचे युको बँकेत खाते असून, सुमन शर्मा नावाची व्यक्ती घेतलेल्या धनादेशाची बनावट पावतीदेखील देत होती. दरम्यान, निकम यांना संशय आल्याने त्यांनी शर्माकडे बँकेतील आजवरच्या ठेवींबद्दल चौकशीदेखील केली; मात्र, त्याच्याकडून केवळ तोंडी माहिती दिली जात होती. तसेच ठेवी काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगून त्यांचे ठेवींकडून लक्ष वळविण्याचाही प्रयत्न केला जात होता. युको बँकेत चौकशी केली असता, सुमन शर्मा नावाचे कोणीही नसल्याचे उघड झाले. २०२२ पासून त्याने नेलेले धनादेश तपासले असता, तब्बल ५४ कोटी २८ लाखांच्या ठेवी बाजार समितीच्या खात्याऐवजी वेगळ्याच खात्यात जमा झाल्याचे उघड झाले.
फसवणूक करूनही आला बाजार समितीत
युको बँकेतल्या १८ कोटींच्या ठेवींची मुदत संपल्याने त्याच्या व्याजाचे एक कोटी ३७ लाख रुपये कॅनरा बँकेत जमा करण्यासाठी सीईओ निकम यांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार शर्मा याने निकम यांच्या दालनात येऊन ती रक्कम वर्ग केल्याचे तोंडी सांगितले होते. मात्र, खात्यावर रक्कम न दिसल्याने निकम यांनी बँकेत चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे समोर आले.
‘ते’ अधिकारी कोण?
पोलाद बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी त्यालाच मिळाव्यात यासाठी मागील दोन वर्षांत व त्यापूर्वी सुमन कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, याची चौकशी पोलिस करीत आहेत.
शर्माच्या पाठीमागे कोण?
युको बँकेत बाजार समितीचे खाते उघडल्यानंतरच शर्माने बाजार समितीच्या कार्यालयात येऊन स्वतःला बँक अधिकारी सांगितले होते. यामुळे त्याला समितीच्या बँक व्यवहारांची माहिती मिळाली कशी? याचीही चौकशी पोलिसांमार्फत होणार आहे.
असा आहे घटनाक्रम
- कार्यकारी अधिकारी अमीष श्रीवास्तव यांच्यासह मुख्य लिपिक संजय पाटील, कनिष्ठ लिपिक संगीता म्हात्रे यांनी पहिला सहा कोटींचा धनादेश शर्माला दिल्यावर त्यावर युको बँक युवर सेल्फ असे लिहिल्याने तो धनादेश परत आला.
- त्यानंतर श्रीवास्तव, म्हात्रे व पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डोंगरे यांच्यासमोर मुदत ठेवींसाठी हाच प्रस्ताव ठेवल्यावर डोंगरे यांनी मंजुरी दिल्यावर बाजार समितीचे अध्यक्ष अशोककुमार गर्ग आणि डोंगरे यांच्या स्वाक्षरीने टप्प्याटप्प्याने कॅनरा बँकेतून रक्कम संबंधित खात्यात वर्ग झाली.