नवी मुंबई - बारबाला हटाव मोहिमेसह लॉज व सर्व्हिस बार यावरही कारवाईची मागणी शिरवणे ग्रामस्थांकडून पुढे येत आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करून स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. या वेळी ग्रामस्थांकडून प्राप्त होणारी निवेदने जिल्हाधिकाºयांना देऊन परिसरातील लॉज व सर्व्हिसबारवर बंदीसाठी साकडे घातले जाणार आहे.भाडोत्री घरांमध्ये वाढत्या बारबालांमुळे शिरवणे गावच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे, त्यामुळे मागील दोन दशकांपासून तिथल्या मूळ ग्रामस्थांना इतर गावांमध्ये अपमानाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, गावची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी ग्रामस्थांसह तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता बारबाला हटाव मोहीम राबवली जात असून, या संदर्भात घरोघरी जनजागृती केली जात आहे.नशेच्या आहारी व वाममार्गाला जाणाºया तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याकरिताही त्यांनी पाऊल उचलले आहे. यानुसार शिरवणे गावातील अवैधरीत्या सुरू असलेले लॉज व सर्व्हिस बार बंद करण्याची मागणी केली जात आहे. याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून, त्यास भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचे युवा मंचचे कार्यकर्ते अविनाश सुतार यांनी सांगितले. या दरम्यान स्थानिकांकडे बारबाला, लॉज व सर्व्हिस बार यामुळे होणाºया त्रासाच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. त्या सर्व तक्रारी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवून शिरवणे गावाला अवैध लॉज, बार व बारबाला यांच्यापासून मुक्त करण्याचे साकडे घातले जाणार असल्याचेही सुतार यांनी सांगितले.या संदर्भात यापूर्वी शिरवणे ग्रामस्थांनी नेरुळ पोलिसांकडेही पत्र दिलेले आहे; परंतु स्थानिक स्तरावर ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी स्तरावर प्रयत्न चालवले आहेत, त्यामुळे शिरवणे ग्रामस्थांचा हा लढा प्रतिष्ठेचा ठरला असून, प्रशासनाचा त्यास कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व्हिस बारबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, शिरवणे ग्रामस्थांच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 3:30 AM