नवी मुंबई :खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक, एनएमएमटीला १३ कोटींचा फटका; एसटीचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:55 AM2018-01-22T02:55:30+5:302018-01-22T02:55:40+5:30
पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यात उपक्रमाला अपयश आले आहे. अवैध वाहतूक करणाºयांनी समांतर यंत्रणा उभी केली असून, वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने २०१८- १९चा अर्थसंकल्प सादर केला आहे. गतवर्षी ३१९ कोटी दोन लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता; परंतु नवीन ६० बसेस वेळेत ताफ्यात आल्या नाहीत व अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवासी संख्येत वाढ होऊ शकली नाही. तब्बल ७१ कोटी ४६ लाख रुपयांचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. यामुळे २४७ कोटी ६९ लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला असल्याचे प्रशासनाने मान्य केले ंआहे.
परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी त्यांच्या निवेदनामध्ये त्याविषयी स्पष्ट उल्लेखही केला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुईनगर, सानपाडा व नेरुळ रेल्वेस्थानकावरून कल्याण, डोंबिवली, उरणपर्यंत ट्रक्स व इतर वाहनांतून प्रवासीवाहतूक केली जात आहे. याशिवाय खारघर, तळोजा, महापे, ठाणे सिडको बसस्टॉप परिसरामध्ये तब्बल दीड हजार खासगी वाहनांमधून अवैधपणे प्रवासीवाहतूक केली जाते. याशिवाय ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, उरण रोडवर अनेक खासगी बसेस व इतर वाहनांमधून प्रवासीवाहतूक सुरू आहे.
एनएमएमटीने गतवर्षी प्रवासी वाहतुकीमधून १०२ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिश्ट निश्चित केले होते; पण प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेर ५५ कोटी ९७ लाख रुपये वसूल झाले होते. मार्चअखेरपर्यंत उत्पन्नाचा आकडा ८९ कोटी ४४ लाख रुपये होण्याची शक्यता आहे. तब्बल १३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे परिवहनला परवडणारे नाही. अशीच स्थिती राहिली, तर तोटा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. एनएमएमटी बरोबर बेस्ट, केडीएमटी व एसटी, बसेसच्या उत्पन्नावरही प्रचंड परिणाम होत आहे. महामार्गावर एसटीच्या थांब्यावरून खासगी ट्रॅव्हल्स, कार, जीप व इतर वाहनांमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे.
तीन हजारांपेक्षा जास्त खासगी वाहने धावत आहेत. एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असून, तो भरून काढण्यासाठी आरटीओ, पोलीस व परिवहन उपक्रमांनाही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
संयुक्त कारवाईची गरज
अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी एनएमएमटी, एसटी महामंडळ, पोलीस, आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज आहे. कारवाईसाठी व पाठपुरावा करण्यासाठी समन्वय समिती तयार करावी. सर्वांनी एकत्र येऊन विशेष मोहिमा राबविल्या, तरच अवैध प्रवासीवाहतूक थांबेल, असे मत एनएमएमटी कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.
बसेसचे प्रमाण वाढवावे
अवैध प्रवासीवाहतुकीमुळे नुकसान होते हे खरे आहे; परंतु एनएमएमटी व इतर उपक्रम चांगली व वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर अवैध वाहतूक आपोआप बंद होईल, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे. गाड्याची दुरवस्था, वारंवार होणारा बिघाडामुळे खासगी वाहतुकीला प्रवाशांकडून पसंती मिळत आहे.
१०४ कोटींचे उद्दिष्ट
एनएमएमटी उपक्रमाने पुढील वर्षासाठी १०४ कोटी रुपये उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षीचे उत्पन्न ८९ कोटी आहे. अवैध वाहतूक थांबविली नाही, तर पुढील वर्षाचे उद्दिष्ट साध्य करणेही अशक्य होणार आहे. एनएमएमटीचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर अवैध वाहतूक थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.