Navi Mumbai: गुंतवणुकीच्या बहाण्याने दोघांना ऑनलाईन गंडा, टास्क पडला महागात, नफ्याच्या अमिषाला भुलून भरले पैसे
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 5, 2024 07:11 PM2024-01-05T19:11:28+5:302024-01-05T19:12:04+5:30
Navi Mumbai Crime News: टास्क पूर्ण करून अधिक नफा कमवण्याच्या अमिषाला भुललेल्या दोघांची लाखोंची फसवणूक झाली आहे. दोघांनाही अज्ञात व्यक्तींनी गुंतवणुकीच्या फसव्या योजना सांगून पैसे भरण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई - टास्क पूर्ण करून अधिक नफा कमवण्याच्या अमिषाला भुललेल्या दोघांची लाखोंची फसवणूक झाली आहे. दोघांनाही अज्ञात व्यक्तींनी गुंतवणुकीच्या फसव्या योजना सांगून पैसे भरण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ऐरोली येथे राहणाऱ्या कपिल शाह यांची १८ लाख ९० हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यांना अज्ञात व्यक्तीने मॅसेजद्वारे गुंतवणुकीतून अधिकाधिक नफ्याची माहिती दिली होती. त्या मॅसेजला शाह यांनी प्रतिसाद दिला असता त्यानं टेलिग्राम ग्रुपमध्ये घेण्यात आले. त्याठिकाणी त्यांना टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले असता शाह यांनीही त्यांना भुलून तब्बल १८ लाख ९० हजार रुपये संबंधितांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतरही कोणताही नफा न मिळता अधिक पैशाची मागणी होऊ लागल्याने फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच प्रकारे कोपरी येथील नीलम पटेल यांची अडीच लाखाची फसवणूक झाली आहे. त्यांनाही टास्कच्या माध्यमातून सहज पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. शिवाय गुंतवणूक केली जाणारी रक्कम बिट कॉइनद्वारे शेअर मार्केटमध्ये भरून नफा दिला जाईल असेही सांगण्यात आले. मात्र २ लाख ५४ हजार रुपये भरूनही नफा मिळत नसल्याने व अधिक पैशाची मागणी होऊ लागल्याने त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवून एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.