- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - नांदेड येथील रुग्ण महिलेला उपचाराच्या बहाण्याने खारघरमध्ये आणून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर तिने यासंदर्भात नांदेड येथे पोलिसांकडे तक्रार केली असता त्याठिकाणी गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
नांदेड येथे राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेसोबत डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला आहे. सदर महिला शाररिक व मानसिक व्याधीने त्रस्त होती. यामुळे तिच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्याच परिचयाच्या एका व्यक्तीने त्यांना ओळखीच्या ठिकाणी उपचार करून देतो असे सांगितले होते. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला असता तो तिला घेऊन खारघरमध्ये आला होता. त्याठिकाणी त्याने तिला एका घरात आश्रयासाठी नेवून त्याच ठिकाणी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला.
दरम्यान अगोदरच रुग्णावस्थेत असल्याने त्यातच घडलेल्या या प्रकारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला होता. दरम्यान नुकतेच प्रकृतीत झालेल्या सुधारानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेल्या कृत्याची नांदेड पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून सदर घटना खारघर परिसरात घडलेली असल्याने गुन्हा पुढील तपासासाठी खारघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र याबाबत महिलेकडे चौकशी झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस येईल असे खारघर पोलिसांनी सांगितले.