नवी मुंबई - ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एपीएमसी आवारात तो ड्रग्स विक्रीसाठी आला असता सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
एपीएमसी आवारातील जुने आरटीओ चाचणी मैदान परिसरात एकजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक सचिन कोकरे, श्रीकांत नायडू, हवालदार रमेश तायडे, अंकुश म्हात्रे, राकेश आहिरे आदींचे पथक केले होते. त्यांनी १ जुलैला रात्री शालिमार हॉटेल परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयित वर्णनाचा एकजण त्याठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. अंग झडतीमध्ये त्याच्याकडे ६० ग्रॅम मेफेड्रोन हे ड्रग्स मिळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ६ लाख रुपये आहे. याप्रकरणी त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक केलेल्या तरुणामार्फत त्याच्या इतर साथीदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.