Navi Mumbai: ..अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू, पाणीटंचाई प्रश्नावर गणेश नाईक आक्रमक
By कमलाकर कांबळे | Published: November 9, 2023 07:38 PM2023-11-09T19:38:59+5:302023-11-09T19:39:20+5:30
Navi Mumbai: स्वत:च्या मालकीचे धरण असतानासुद्धा शहराच्या अनेक भागांत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचबरोबर अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याविरोधात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - स्वत:च्या मालकीचे धरण असतानासुद्धा शहराच्या अनेक भागांत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचबरोबर अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याविरोधात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी त्यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. पाणीप्रश्नासह विविध प्रलंबित प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करा, अन्यथा पेन, पेन्सिल डाउन आंदोलन करून महापालिकेचे कामकाज बंद पाडू, असा इशारा दिला.
पाणीवितरणातील त्रुटी तसेच पाण्याचा कमी दाब यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी तर आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो आहे. बारवी धरणातून नवी मुंबईला होणारा हक्काचा पाणीपुरवठा अर्धाच होतो आहे. पाणीचोरी देखील होत आहे. महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही, असे स्पष्ट करून पुढील पंधरा दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर पुढच्या वेळेस महापालिकेचे कामकाज बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
काही स्वार्थी आणि भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी जनतेची कामे करीत नाहीत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या घटकांच्या दबावाखाली येऊन अत्यावश्यक कामेदेखील दीर्घकाळ प्रलंबित ठेवतात. आयुक्तांचीदेखील हे अधिकारी दिशाभूल करतात, असा आरोप करून अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.
नवी मुंबईतही हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. खासकरून खैरणे, पावणे, बोनकोडे, तुर्भे अशा सर्वच औद्योगिक विभागामध्ये हवा प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. या प्रकाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या घटकांवर कारवाई करावी. प्रशासनाने कंत्राटी सेवेतील १९२ शिक्षकांपैकी ५० प्राथमिक शिक्षकांना कायम केले आहे. या प्रक्रियेत अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सर्वच शिक्षकांना कायम करा, अशी मागणीही त्यांनी आयुक्त नार्वेकर यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.