नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:19 AM2019-06-29T02:19:09+5:302019-06-29T02:20:03+5:30
नवी मुंबईसह पनवेलकरांना शुक्रवारी पावसाने झोडपले. पावसाने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
नवी मुंबई, पनवेल, उरण - नवी मुंबईसह पनवेलकरांना शुक्रवारी पावसाने झोडपले. पावसाने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमधील गावदेवी पाडा परिसरामध्ये घरात पाणी शिरले होते. रेल्वे व बस सुविधेवरही परिणाम झाला होता. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कामावर जाणाºया चाकरमान्यांची गैरसोय झाली. रेल्वे व बसेसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेकांना कार्यालयात जाण्यास विलंब होत होता. महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पहिल्याच पावसामध्ये फोल झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मिलेनियम बिझनेस पार्क, ऐरोली टी जंक्शन, बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट, शिरवणे भुयारी मार्गासह एकूण आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी दोन फुटांपेक्षा जास्त पाणी भरल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे बाजार समितीच्या व्यवहारावरही काही प्रमाणात परिणाम झाला. ग्राहकांची संख्या कमी झाली होती.
पावसाने पनवेलमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. पनवेल, शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या होत्या.
सिडको वसाहतीमध्ये पाणीच पाणी
नेरु ळ सेक्टर २ मधील आम्रपाली अपार्टमेंट या सिडकोनिर्मित वसाहतींमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने सोसायटीच्या आवारात सुमारे दोन फूट पाणी साचले होते. साचलेले पाणी बैठ्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.
बाजार समितीही जलमय
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रवेशद्वारांवर एक फूटपेक्षा जास्त पाणी साचले होते. मॅफ्कोपासून बाजार समितीपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामुळे येथील व्यापारावरही काही प्रमाणात परिणाम झाला होता.
कळंबोलीसह खांदा कॉलनीत पाणी
शुक्र वारी पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे नवीन पनवेल खांदा वसाहत आणि कळंबोलीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. सिडकोने नालेसफाई व्यवस्थित न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. न्यू इंग्लिश स्कूल चार रस्त्यावर दोन फूट पाणी जमा झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठी कसरत करावी लागली. आपल्या पाल्यांना सोडत असताना पालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शाळेच्या समोरच्या उद्यानाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पहिल्याच पावसात कळंबोलीकरांची दाणादाण आणि सिडकोचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला. सेंट जोसेफ हायस्कूल परिसर जलमय झाला होता. शिवसेना शाखेजवळ पावसाचे पाणी साचले होते. नेहमीप्रमाणे सेक्टर ४, १४ आणि १५ येथे रस्ते पाण्यात गेले होते. खांदा वसाहतीत सेक्टर १३ येथे वेगाने पाणी रस्त्यावरून वाहत होते. शिवाजी चौकात काही प्रमाणात पाणी साचले होते. नवीन पनवेल वसाहतीत अभ्युदय बँक, समाज मंदिर, पोस्ट आॅफिस, शिवा संकुल येथे काही प्रमाणात पाणी साचले होते. मुंबई-पुणे महामार्गावर ओरियन मॉल येथे तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला. नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
शिरवणे येथील भुयारी मार्ग पाण्यात
नेरु ळ पूर्व आणि पश्चिम असा मार्ग जोडणाºया शिरवणे येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. भुयारी मार्ग खोलगट भागात असल्याने शिरवणे गाव आणि जुईनगर सेक्टर २४ मधील रस्त्यावरून वाहणारे पाणी या मार्गात साचले. या साचलेल्या पाण्यातून ये-जा करताना नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. या पाण्यातून ये-जा करताना वाहने बंद पडत असल्याने अनेक वाहनचालकांनी राजीव गांधी उड्डाणपुलाचा आधार घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांना आणि पालकांनादेखील या पाण्यातून शाळा गाठावी लागली. पाण्यातून ये-जा करताना लहान शाळकरी मुलांना पालकांनी उचलून घेतले होते.
ट्रकमुळे वाशी खाडीपुलावर वाहतूककोंडी
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर ट्रक बंद पडल्याने त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे मुंबईकडील लेनवर टोलनाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सुमारे चार तासांनंतर त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली. सायन-पनवेल मार्गावर वाशी खाडीपुलावर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच ४३ वाय ३१४५) पुलावर आला असता त्याचा मागचा टायर फुटला. सुदैवाने चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकण्याचे टळले.
अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, टायर फुटल्याने मार्गातच उभ्या असलेल्या या ट्रकमुळे त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर ऐन सकाळच्या रहदारीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही वेळातच वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांच्या रांगा वाशी प्लाझापर्यंत लागल्या होत्या. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईकडे जाणाऱ्यांना वाहतूककोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ट्रकचा टायर बदलून त्या ठिकाणावरून तो हटवण्यात आला.
त्यानंतर पुढील काही मिनिटांत वाशी टोलनाक्याच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली. यादरम्यान वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने रेडिओवर घटनेची माहिती देऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात ऐरोली मार्गे वळवली. मात्र, वाशी वाहतूक शाखेत सध्या पूर्ण वेळ वरिष्ठ निरीक्षक नसल्याने शुक्रवारी उद्भवलेली परिस्थिती वाहतूक पोलीस योग्यरीत्या हाताळू शकले नाहीत. वाशी वाहतूक शाखेच्या विद्यमान वरिष्ठ निरीक्षकाकडे पोलीस आयुक्तालयाचाही पदभार असल्याने वाहतूक शाखेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.