- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. नवीन प्रकारचा कोरोना पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहरवासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असले तरी नागरिकांकडून मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू झाले आहे. नवी मुंबई, पनवेल व उरणमधील रुग्णसंख्या तब्बल ८९ हजार ३४० झाली आहे. प्रतिदिन सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असून नागरिकांनी योग्य काळजी घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन महानगरपालिका, एक नगरपालिका, जेएनपीटी बंदर व दाेन औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. काेरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणाऱ्या शहरांमध्येही नवी मुंबईचा समावेश आहे. पनवेल व उरण परिसरामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पनवेलमध्ये आहेत. आरोग्य विभागाने प्रयत्न करून प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. यामुळे नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्कचा वापर व गर्दी टाळणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांकडून आता नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. सरकारी कार्यालयांमध्येही कामानिमित्त जाणारे नागरिकही अनेकदा मास्क वापरत नाहीत. मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेच्या नियमांचे उल्लंघन होते आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. परंतु मागील काही महिन्यांमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांच्या खाली येत नाही. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची गरजही अनेक रुग्णांना लागत आहे. नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाची जागृती तीनही शहरे कोरोनामुक्त करायची असतील तर नागरिकांनी नियमांचे कोटेकोर पालन करणे आवश्यक असून प्रशासनानेही त्यादृष्टीने जनजागृती सुरू केली आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरणची रुग्णसंख्या एक लाखाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:06 AM