नवी मुंबई, पनवेल, उरणकरांचा कोरोनाशी लढा; आठ महिन्यांत ८५ हजार रुग्ण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:42 PM2020-12-30T23:42:51+5:302020-12-30T23:43:02+5:30

स्वच्छता स्पर्धेत देशात ठसा, मेट्रोसह विमानउड्डाणाचा मुहूर्त लांबणीवर

Navi Mumbai, Panvel, Urankar's fight with Corona | नवी मुंबई, पनवेल, उरणकरांचा कोरोनाशी लढा; आठ महिन्यांत ८५ हजार रुग्ण मुक्त

नवी मुंबई, पनवेल, उरणकरांचा कोरोनाशी लढा; आठ महिन्यांत ८५ हजार रुग्ण मुक्त

Next

नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनामुळे नवी मुंबई, पनवेलसह उरण परिसरातील विकासाचे नियोजन वर्षभर कोलमडले. तिन्ही शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल ८८ हजार रुग्ण आढळले असून, त्यामधील ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त करण्यात यश आले. मावळत्या वर्षात मेट्रोसह विमानउड्डाणाचा मुहूर्त लांबणीवर पडला. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची गती मंदावली. औद्योगिक वसाहतीलाही मोठा आर्थिक फटका बसला असला, तरी वर्षभरात अनेक सकारात्मक घटना घडल्या. नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक आला. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे. 

चौथा खाडीपूल?
कोरोना काळात अनेक विकास कामे धिम्या गतीने सुरू असताना शासनाने चौथ्या खाडीपुलाच्या बांधकामाला परवानगी दिल्यामुळे विकासाला नवीन दिशा मिळाली आहे. वाशी ते मानखुर्ददरम्यान तिसऱ्या खाडीपुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे. यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी पूर्णपणे थांबणार आहे. मावळत्या वर्षात नवी मुंबईकरांसाठी हा सर्वात सकारात्मक निर्णय ठरणार आहे.

एपीएमसीत धान्यपुरवठा सुरळीत
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्व जनजीवन ठप्प झाले हाेते. मुंबईसह नवी मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक संकटांशी सामाना करत सुरळीतपणे धान्यपुरवठा सुरू ठेवला. तेथील अनेक कामगारांना लागण झाली. मात्र त्यावर मात करीत काम सुरू ठेवले. समितीच्या या कामाचे शासनानेही कौतुक केले आहे.

प्रकल्पांची रखडपट्टी
नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन फेब्रुवारी, २०१८ मध्ये झाले. तेव्हा विमानाचे पहिले उड्डाण २०२० मध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु दोन वर्षांनंतरही सपाटीकरण व इतर कामेच सुरू आहेत. मेट्रो रेल्वेचा मुहूर्तही चुकला आहे. घणसोलीमधील आंतरराष्ट्रीय स्टेडियम, नवीन मलनिस्सारण वाहिनी व इतर महत्त्वाची कामे होऊ शकली नाहीत. कोरोना नियंत्रणासाठीचा खर्च वाढल्यामुळे व उत्पन्न घटल्याने अत्यावश्यकसेवा वगळून इतर विकासकामांना कात्री लावावी लागली.

पोलिसांचे काम कौतुकास्पद
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात दिवसरात्र बंदोबस्त ठेवलाच, याशिवाय परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठीची चोख व्यवस्था केली. मजुरांना धान्यपुरवठा करण्यासह विविध प्रकारची सामाजिक कामेही पोलिसांनी केली. गत वर्षीच्या तुलनेमध्ये २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या कमी करण्यातही यश मिळविले. पोलिसांनी केलेल्या कामाचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे.

कोरोनामुक्तीला पालिकांचे प्रथम प्राधान्य
नवी मुंबईसह पनवेलमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व या परिसरातील विकासाचे सर्व नियोजन कोलमडले. दोन्ही महानगरपालिका ग्रामीण परिसर व उरणमध्ये दहा महिन्यांत कोरोनाचे तब्बल ८८ हजार रुग्ण सापडले. आतापर्यंत १,९०६ जणांचा मृत्यू झाला असून, ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. वर्षअखेरीस तीन शहरांमध्ये फक्त १,३६७ रुग्ण शिल्लक आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून, नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. संपूर्ण वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास द्यावा लागला.

पाचही प्रशासकीय प्रमुखांची बदली

नवी मुंबई पनवेल परिसरातील पाचही प्रमुख अस्थापनांच्या प्रमुखांची वर्षभरात बदली करण्यात आली. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या कोकण भवनमधील विभागीय आयुक्त शिवाजी दाैंड निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. सिडिकाेचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची बदली होऊन संजय मुखर्जी यांची वर्णी लागली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस आयुक्त पदाचीही खांदेपालट झाली आहे. संजय कुमार यांच्या जागेवर बीपीनकुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे. कोरोनाच्या काळात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांची वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच पाच प्रमुखांची एकाच वर्षात बदली झाली आहे.

Web Title: Navi Mumbai, Panvel, Urankar's fight with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.