सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोना काळातही नवी मुंबईसह पनवेलमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर व जुगार तेजीत सुरू आहेत. अशा अवैध धंद्यांची थेट आयुक्तालयातूनच पाठराखण होत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
वाझे प्रकरणानंतर मुंबईतल्या बार व्यावसायिकांकडून कोट्यवधींची वसुली होत असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांकडूनही डान्सबार, बार व्यावसायिक यांच्यासह इतर अवैध धंदे चालकांना आश्रय मिळत असल्याचे समोर येऊ लागले आहे. परिणामी अल्पावधीतच नवी मुंबईसह पनवेल हे अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. अवैध धंद्यांमुळे वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती कायदा व सुव्यवस्थेला हानी पोहोचवित आहे. त्यामुळे लगतच्या शहरातील गुन्हेगारांनी देखील आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळविला आहे. यातूनच घरफोडी, जबरी लूट अशा गुन्ह्यांसह तोतया पोलिसांचा सुळसुळाट सुरू आहे, तर डान्सबार, उशिरापर्यंत चालणारे बार व हॉटेल याठिकाणी पहाटेपर्यंत मैफील रंगत असल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी काही ठिकाणी हाणामारीच्या अनेक घटना महिन्याभरात घडल्या आहेत, तर हुक्का पार्लर चालकांना सर्वच प्रशासनाचे अभय मिळत असल्याने मध्यरात्रीपर्यंत पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. त्या सर्वांकडून मागील वर्षभरात लॉकडाऊनमध्ये झालेला तोटा भरून काढण्याची चढाओढ सुरू आहे. त्याकरिता काहींनी थेट आयुक्तालयातूनच पाठबळ मिळविल्याचे चर्चा आहे, तर काहींनी गुन्हे शाखेतल्या "भाल्याची" ढाल बनवली आहे.
संपूर्ण आयुक्तालयात आपण ठरवू तिथेच कारवाई होते असा रुबाब या हवालदाराकडून झाडला जात आहे. त्यामुळे गुटखा, चरस, गांजा विक्रेत्यांमध्ये त्याचा चांगलाच दोस्ताना आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याचे बार व्यावसायिकासोबतचे संबंध आयुक्तांपर्यंत पोहोचविले आहेत. त्याबाबत आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्याकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही.
तीन महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असा गंभीर आरोप एका पोलिसावर झाला होता. त्याच्यावर कारवाईत कसूर केल्याने तिथल्या वरिष्ठ निरीक्षकाला बदलीला सामोरे जावे लागले. मात्र, त्या हवालदारावर बदलीव्यतिरिक्त ठोस कारवाई न झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोपवल्या जाणाऱ्या अशासकीय टार्गेटचा ताण पोलिसांवर पडत आहे. यातूनच गेल्या महिन्यात परिमंडळ दोन मधील दोन पोलिसांचे नाराजी नाट्य झाले होते. तर परिमंडळ एकमधील एका पोलिसानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
पोलिसाला गुन्हेगाराची साथ गुन्हे शाखेच्या एका युनिटमधील हवालदाराकडून मुंबईतल्या गुंडाला सोबत घेऊन गुडविल गोळा केला जात आहे. त्यामुळे हा गुन्हेगार नवी मुंबईतल्या अवैध धंदे चालकांच्या चांगला परिचयाचा झाला आहे. एखाद्या बार व्यावसायिकाने मापात पाप केल्यास किंवा नकार दिल्यास कारवाईचा धाक दाखविला जात आहे. त्या हवालदारावर एका युनिटची व एका विशिष्ट अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.