कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न; पहिल्याच दिवशी ३,२२५ गणरायांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:39 AM2020-08-25T00:39:34+5:302020-08-25T00:39:48+5:30
१३५ तलावांची निर्मिती; पर्यावरणाचेही संवर्धन
नवी मुंबई : पर्यावरण रक्षण व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेने २३ मुख्य विसर्जन स्थळाव्यतिरिक्त तब्बल १३५ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पहिल्याच दिवशी या ठिकाणी ३,२२५ गणरायांना निरोप देण्यात आला. यापुढेही याविषयी व्यापक जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व कोरोना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहरातील २३ तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. यापूर्वी कोपरीमध्ये कृत्रिम तलाव निर्माण केला जात होता, परंतु त्याला भाविकांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. कोपरीमधील तलाव गणेशभक्तांसाठीही गैरसोयीचा होता. या वर्षी आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांच्या सोयीप्रमाणे उद्यान, मैदान, बसडेपो व इतर मोकळ्या जागेवर कृत्रिम तलाव निर्माण करण्याचे आदेश दिले होते. मनपाच्या अभियांत्रिकी विभागाने तब्बल १३५ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली.
प्रत्येक तलावावर स्वयंसेवक, सफाई कामगार, मनपाचे अभियंते तैनात करण्यात आले होते. माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी व्यापक जनजागृती केली होती. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन रविवारी पहिल्या दिवशी नागरिकांकडून कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळाला. ३,१०० घरगुती व १२५ सार्वजनिक गणरायांना कृत्रिम तलावांमध्ये निरोप देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृत्रिम तलावांनाही पसंती दिली जात आहे. कृत्रिम तलाव नक्की कुठे आहेत, याविषयी लोकप्रतिनिधींनीही जनजागृती केली होती. अनंत चतुर्थीपर्यंत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये अशाच प्रकारे जनजागृती केली, तर अजून प्रतिसाद वाढू शकणार आहे. पहिल्या दिवशी कृत्रिम तलावांमध्ये ३,२२५ व पारंपरिक तलावांमध्ये ३,२१३ गणरायांना निरोप देण्यात आला.