घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड

By नामदेव मोरे | Published: February 4, 2023 10:27 AM2023-02-04T10:27:29+5:302023-02-04T10:27:55+5:30

Navi Mumbai : घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न देशपातळीवर अनुकरणीय ठरू लागला आहे. शहरातून रोज ६५० ते ७०० टन कचरा तयार होतो.

Navi Mumbai Pattern of Solid Waste Management, Creation of RDF with Fertilizer, Modernization of Waste Transportation by Municipal Corporation | घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड

घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न देशपातळीवर अनुकरणीय ठरू लागला आहे. शहरातून रोज ६५० ते ७०० टन कचरा तयार होतो. यातून रोज ९० टन खत व सरासरी २५० टन आरडीएफची निर्मिती केली जाते. कचरा वाहतुकीलाही आधुनिकतेची जोड दिली आहे. सोसायटीमधील कचराकुंडीला आरएफआयडी, तर वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. 

घनकचरा व्यवस्थापन हा प्रत्येक महापालिकांसमोरील गंभीर प्रश्न आहे. शहरात साठलेले कचऱ्याचे ढीग व डंपिंग ग्राउंड परिसरातील दुर्गंधी कमी करण्यात अनेक महापालिका व नगरपालिकांना अपयश आले आहे. हा प्रश्न सोडविण्यात नवी मुंबई महानगरपालिकेला इतरांच्या तुलनेत चांगले यश आले आहे. कोपरखैरणेमधील डंपिंग ग्राउंड बंद करून तेथे उद्यान विकसित केले आहे. तुर्भेमधील पाच सेल बंद केले आहेत. सहावा सेल सुरू असून, दुर्गंधी पसरू न देता कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. शहरातील ६५० ते ७०० टन कचऱ्याचे वर्गीकरण करून तो डंपिंग ग्राउंडवर नेला जातो. 

तेथे भव्य शेडमध्ये ओल्या कचऱ्याचे विंड्रोल तयार केले जातात. प्रत्येक विंड्रोल जवळपास २८ दिवस ठेवला जातो. त्यानंतर मशीनवर चाळणी करून खतनिर्मिती केली जाते. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास ९० टन खतनिर्मिती होते. सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाते. कागदी पुठ्ठे, लाकूड, कापड व इतर कचऱ्यावर प्रक्रिया करून रिफ्यूज ड्राइड फ्यूएल अर्थात आरडीएफ तयार केले जात आहे. या आरडीएफचा कारखान्यांमधील बॉयलरमध्ये इंधन म्हणून उपयोग केला जातो.

महानगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. कचऱ्यातून खतनिर्मिती व आरडीएफची निर्मिती केली जात आहे. 
    - संजय देसाई, शहर अभियंता

१६,०००  कचराकुंड्यांचे वाटप
शहरातील कचरा वाहतुकीमध्येही आधुनिक यंत्रणेचा उपयोग केला जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना महानगरपालिकेने जवळपास १६ हजार कचराकुंड्या दिल्या आहेत. ओला, सुका व घातक कचऱ्यांसाठी स्वतंत्र डबे पुरविण्यात येत आहेत. प्रत्येक डब्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) बसविण्यात आला आहे. यामुळे डबे कधी उचलले याची माहिती प्रशासनास मिळते. वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. 

 कचरा संकलन व वाहतुकीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. सोसायटीमधील कचऱ्याच्या डब्यांमध्ये आरएफआयडीचा वापर केला जात आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. 
- डॉ. बाबासाहेब राजळे,
    उपायुक्त, घनकचरा

प्लास्टिकवरही प्रक्रिया 
    डंपिंग ग्राउंडवर कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा वेचला जातो. प्लास्टिकवरही प्रक्रिया केली जात आहे.
    प्लास्टिक तुकड्यांचे गोळे तयार करून त्यांचा रस्ते बनविण्यासाठी व इतर वस्तू बनविण्यासाठी उपयोग केला जातो.

Web Title: Navi Mumbai Pattern of Solid Waste Management, Creation of RDF with Fertilizer, Modernization of Waste Transportation by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.