- नामदेव मोरे नवी मुंबई : अमली पदार्थ विक्री करणाºया माफियांचे कंबरडे मोडण्यास पोलिसांना यश येऊ लागले आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये अडीच वर्षांत तब्बल ८२ गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत १४० आरोपींना गजाआड केले असून, त्यामध्ये ८ विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
नवी मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथक तयार केले आहे. या पथकाने व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीने नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर कारवाई सुरु केली आहे. २०१६ पूर्वी आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एपीएमसी व इतर काही ठिकाणी उघडपणे गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री होत होती.
सर्वसामान्य नागरिकांनाही गांजा कुठे मिळतो, याविषयी माहिती होती. शहरातील उद्याने, तलाव, मोकळ्या इमारतींमध्ये दिवसरात्र अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे अड्डे तयार झाले होते. हे अड्डे बंद करण्यासाठी काही वर्षांपासून पोलिसांनी कंबर कसली आहे. २०१८ पासून अनेक ठिकाणी छापा टाकून साठा हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. १५ मार्च, २०१८ मध्ये तळोजा-मुंब्रा मार्गावर १०० किलो गांजा जप्त केला होता. २२ मार्च, २०१८ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ३७७ किला गांजा जप्त केला होता.
एपीएमसीमधील टारझनचा अड्डा बंद झाला आहे. २०१८ मध्ये १९ गुन्हे दाखल केले होते. २०१९ मध्ये तब्बल ५१ गुन्हे दाखल केले होते. २०२०च्या जुलैपर्यंत १२ गुन्हे दाखल केले आहेत. डीआरआय व इतर ठिकाणच्या पथकानेही काही कारवाया केल्या आहेत. तसेच. पोलिसांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीही केली आहे. अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. अमली पदार्थांची विक्री व सेवन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्याविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. अडीच वर्षांत ८२ गुन्हे दाखल करून १४० जणांना गजाआड केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये व शहरभर जनजागृतीही केली जात आहे. शहरात कुठेही अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री सुरू असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात यावी.- रवींद्र बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक
पनवेल परिसरामधील तपशील : १५ मार्च, २०१८ - तळोजा-मुंब्रा मार्गावर १०० किलो गांजा जप्त, २२ मार्च, २०१८ - मुंबई-गोवा महामार्गावर ३७७ किलो गांजा जप्त, १९ जून, २०१८ - कळंबोलीमध्ये १६ किलो २०० ग्रॅम अफूसह कोडाइन जप्त, २९ जून, २०१८ - तळोजामध्ये सात लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, २ जुलै, २०१८ - कळंबोलीमधून १९ लाख रुपये किमतीचे अफूसह कोडाइन जप्त, २९ आॅगस्ट, २०१८ - पनवेलमध्ये तीन किलो गांजा जप्त, ११ जानेवारी, २०१९ - कळंबोलीमध्ये १0 किलो गांजा जप्त, १९ जानेवारी २०१९ - पनवेलमधून ८ किलो गांजा जप्त, १० एप्रिल, २०१९ - पनवेल परिसरामध्ये चार किलो गांजा जप्त, २३ जुलै, २०१९ - कळंबोलीमध्ये दोन किलो गांजा जप्त, महिलेला अटक, २६ जुलै, २०१९ - दिल्ली पोलिसांनी जेएनपीटी परिसरामध्ये १,३०० कोटी रुपये किमतीचे १३० किलो हेरॉइन केले जप्त.
नवी मुंबई परिसरातील तपशील : २ मे, २०१८-२३ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त, ८ मे, २०१८-१९ एलएसडी पेपरसह एका आरोपीला अटक, १३ जून, २०१८ - घणसोलीमधून २० किलो गांजासह तिघांना अटक, ८ एप्रिल, २०१८-१ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ब्राउन शुगर जप्त, २१ आॅक्टोबर, २०१८ - ऐरोलीमधून २५ किलो कॅनाबिस ड्रगसह एकाला अटक, ९ फेब्रुवारी, २०१८ - नेरुळमध्ये दीड किलो चरस जप्त, एकाला अटक, ११ एप्रिल, २०१९ - साडेचार लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त, २१ एप्रिल, २०१९ - रबाळेमध्ये दोन किलो गांजा जप्त, १७ जून, २०१९ - कोपरखैरणेमध्ये ८५ लाख रुपये किमतीची ३१ किलो एमडी पावडर जप्त.